खिंडसीत उतरले ‘सी प्लेन’
By Admin | Updated: November 16, 2014 00:49 IST2014-11-16T00:49:56+5:302014-11-16T00:49:56+5:30
रामटेकच्या खिंडसी जलाशयात विदर्भातील पहिले ‘सी प्लेन’ शनिवारी सकाळी ११.४० वाजता उतरले. त्यानंतर अर्धा तास येथे थांबल्यानंतर नवेगाव खैरी जलाशयाकडे ते रवाना झाले.

खिंडसीत उतरले ‘सी प्लेन’
विदर्भातील पहिला यशस्वी प्रयोग : आता विमानाने फिरायला चला नागपूर-खिंडसी, नवेगाव खैरी
रामटेक : रामटेकच्या खिंडसी जलाशयात विदर्भातील पहिले ‘सी प्लेन’ शनिवारी सकाळी ११.४० वाजता उतरले. त्यानंतर अर्धा तास येथे थांबल्यानंतर नवेगाव खैरी जलाशयाकडे ते रवाना झाले. पाण्यात उतरणारे विमान पाहण्यासाठी रामटेककरांसह परिसरातील नागरिकांनी खिंडसी घटेश्वर किनाऱ्यावर गर्दी करीत हा क्षण डोळ्यात साठवला.
मेहर विमान कंपनी (मेरीेटाईम एनर्जी हेल एअर सर्व्हिसेस) सोबत महाराष्ट्र शासन आणि राज्य पर्यटन विकास महामंडळाने करार केला असून त्याअंतर्गत महाराष्ट्रात देशातील पहिली सी प्लेन सेवा सुरू करण्यात आली. या सेवेअंतर्गत पहिले सी प्लेन राज्यात प्रवरा धरणात आणि दुसऱ्यांदा ते लोणावळ्यात उतरविण्यात आले. विदर्भात आज पहिल्यांदाच रामटेकच्या खिंडसीत हा प्रयोग करण्यात आला.
नागपूर ते खिंडसी २० मिनिटात
मेहर कंपनीच्या या सी प्लेनने नागपूर विमानतळावरून सकाळी ११.२० वाजता उड्डाण भरले आणि अवघ्या २० मिनिटात ते रामटेकच्या खिंडसी जलाशयावर पोहोचले. सदर विमान दृष्टिपथात येताच सर्वांच्या नजरा त्यावर स्थिरावल्या. विमानाने जलाशयावर घिरट्या घालायला सुरुवात करताच प्रसिद्धीमाध्यमांचे कॅमेरे सरसावले. परंतु विमान घंटेश्वरपासून बऱ्याच लांब अंतरावर लॅन्ड झाल्याने उपस्थितांची निराशा झाली. नंतर हे विमान पाण्यावरून घंटेश्वरच्या पुढे आणण्यात आले.
सी प्लेनच्या देशातील पहिल्या महिला वैमानिक (पायलट) प्रियंका मनुजा आणि कॅप्टन गौरव हे विमानाचे चालक होते.
जवळपास अर्धा तासपर्यंत हे विमान खिंडसी जलाशयात होते. १२.१० मिनिटांनी विमानाने नवेगाव खैरी जलाशयाच्या दिशेने टेक आॅफ केले. या अर्धा तासाचे धावते समालोचन राजाभाऊ दुरुगकर यांनी केले. सदर विमानाचे हे ट्रायल लॅन्डिग असून पुढे जर प्रवासी मिळाले तर ही विमानसेवा नागपूर - खिंडसी, नवेगाव खैरी अशी नियमित होऊ शकेल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. एकूणच या विमानसेवेमुळे पर्यटनाला मोठा फायदा होणार आहे.
यावेळी खा. कृपाल तुमाने, माजी आमदार आशिष जयस्वाल, रामटेकचे प्रभारी उपविभागीय अधिकारी गिरीश जोशी, मेहर कंपनीचे मालक सिद्धार्थ वर्मा, व्यवस्थापक मनुजा शफिक, सहाब शफिक, उमाकांत अग्निहोत्री, आदित्य धनवटे, रमेश मिश्रा प्रामुख्याने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)