नाफेड करणार एक लाख टन तूर खरेदी
By Admin | Updated: March 4, 2017 05:22 IST2017-03-04T05:22:15+5:302017-03-04T05:22:15+5:30
समाधानकारक पावसामुळे राज्यात तूर आणि हरभऱ्याचे भरघोस उत्पादन झाले आहे.

नाफेड करणार एक लाख टन तूर खरेदी
मुंबई : समाधानकारक पावसामुळे राज्यात तूर आणि हरभऱ्याचे भरघोस उत्पादन झाले आहे. मात्र, साठवणुकीसाठी पुरेशी जागा नसल्याने तूर खरेदीत येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी नाफेडने राज्य सरकारला मदतीचा हात दिला आहे. नाफेडने जास्तीची १ लाख टन तूर आणि ७५ हजार टन हरभरा खरेदी करण्याची तयारी दाखविली आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता.
नाफेडच्या निर्णयामुळे तूर-हरभरा खरेदी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. तूर आणि हरभऱ्याच्या साठवणुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी नाफेडकडून पुरेशा गोण्याही उपलब्ध करुन देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांकडून तूर खरेदीसाठी असलेली मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढविण्यास केंद्राने मान्यता दिली आहे. सन २०१६-१७ या वर्षासाठी तुरीची किमान आधारभूत किंमत प्रतिक्विंटल ४६२५ एवढी असून त्यावर ४२५ एवढा बोनस मिळून एकूण प्रतिक्विंटल ५०५० किमतीची शासनाकडून हमी देण्यात आली आहे. (विशेष प्रतिनिधी)