व्यापाऱ्यांचा आजपासून ‘बंद’
By Admin | Updated: July 11, 2016 01:26 IST2016-07-11T01:26:40+5:302016-07-11T01:26:40+5:30
फळे व भाजीपाला नियमनमुक्त करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशनने येत्या सोमवारपासून (दि. ११) बेमुदत संप पुकारला आहे

व्यापाऱ्यांचा आजपासून ‘बंद’
पुणे : फळे व भाजीपाला नियमनमुक्त करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशनने येत्या सोमवारपासून (दि. ११) बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतीमाल मार्केट यार्डाबाहेर विकावा लागणार आहे. परंतु, शेतकरी स्वत: शेतीमाल विक्रीसाठी मार्केट यार्डात असल्यास त्यांना विरोध केला जाणार नाही, अशी भूमिका अडते असोसिएशनने घेतली आहे.
शासनाच्या या निर्णयाचा फटका गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथील व्यापाऱ्यांना बसणार असून या निर्णयाने बाजार आवाराबाहेरील व्यापाऱ्यांना सेस, अडत आणि इतर खर्चातून सूट देण्यात आली आहे. मात्र, मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना सेस, अडत, तोलाई, मापाई भरावीच लागणार आहे. शासनाचे हे धोरण व्यापारीविरोधी असल्याने रविवारी मार्केट यार्डातील शारदा गणपती मंदिर येथे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशनच्या व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सोमवारपासून बेमुदत बंद पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला.
अडते असोसिएशनचे अध्यक्ष शिवलाल भोसले म्हणाले, की शासनाने घेतलेला निर्णय शेतकरीविरोधी असून त्याचा फटका बाजारातील सर्व घटकांना बसणार आहे. शासनाचे नवीन धोरण तकलादू असून अधिक काळ चालणारे नाही. पूर्वापार चालत आलेली शेतीमाल विक्रीची परंपरा अचानक बदलता येणार नाही. ज्यांना कायद्यातील बदल नको आहे, असे शेतकरी आपला शेतीमाल बाजारात आणणारच नाहीत. ज्यांच्या नावावर सात/बारा आहे, अशा शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्यास आमचा विरोध राहणार नाही.
मार्केट यार्डात एक हजारांहून अधिक गाळे असून अनेक व्यापाऱ्यांनी आपली मालमत्ता गहाण ठेवून हे गाळे विकत घेतले आहेत. नवीन कायद्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे, असे नमूद करून भोसले म्हणाले, की मार्केट यार्डाच्या भिंतीच्या आत शेतीमाल विक्रीसाठी कडक नियमावली आणि या भिंतीच्या बाहेर विक्री करण्यासाठी कोणत्याही अटी नाहीत. हे शासनाचे धोरण अन्यायकारक आणि चुकीचे आहे. सध्या सर्व व्यवहार इमानदारीने सुरू असून नवीन धोरणामुळे तो बेईमानीत सुरू होतील.
बाजार सुरूच राहणार : दिलीप खैरे
व्यापाऱ्यांनी बंद पुकारला असला तरीही सोमवारी बाजार सुरूच राहणार असून बाजार समितीच्या वतीने मार्केट यार्ड येथे शेतकऱ्यांचा माल खरेदी-विक्री करण्यासाठी फळे, भाजीपाला विभागात एकूण १०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना शेतकरी संघटना आणि भारतीय किसान संघाचे कार्यकर्ते मदत करणार आहेत. बाजार समितीचे सर्व पदाधिकारी आणि सचिव सोमवारी येथे उपस्थित राहणार आहेत, असे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे सांगितले. शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपला शेतीमाल मार्केट यार्ड येथे विक्रीस आणावा, असे आवाहन त्यांनी केले.