बस, शाळा व इमारतींची दुरवस्था विधानसभेत
By Admin | Updated: December 17, 2014 03:06 IST2014-12-17T03:06:36+5:302014-12-17T03:06:36+5:30
आमदारांनी मंगळवारी औचित्याच्या मुद्याद्वारे आपापल्या मतदारसंघातील प्रश्न उपस्थित करीत यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.
बस, शाळा व इमारतींची दुरवस्था विधानसभेत
नागपूर : आमदारांनी मंगळवारी औचित्याच्या मुद्याद्वारे आपापल्या मतदारसंघातील प्रश्न उपस्थित करीत यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. कुणी बस, शाळा तर कुणी शासकीय इमारतींच्या दुरवस्थेकडे शासनाचे लक्ष वेधले.
अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्णातील एसटी बसेसच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित केला. एसटीमध्ये बसणे म्हणजे स्वत:चे हातपाय मोडून घेणे होय. अमरावतीमध्ये एकूण ४४३ एसटी बसेस सुरू आहेत. त्यापैकी १६९ बसेसची अवस्था अतिशय दयनीय आहे. येथील बसेस १० लाख किलोमीटरपेक्षा अधिक चालल्या असून ते मानकांपेक्षा अधिक आहे. एकट्या अचलपूर तालुक्यातच ३२ अपघात झाले आहेत. यात चार जणांचा मृत्यूसुद्धा झाला. बसेससंदर्भातही विदर्भाशी दुजाभाव केला जात आहे. चांगल्या बसेस पश्चिम महाराष्ट्राला दिल्या जात असून भंगार झालेल्या बसेस विदर्भाच्या माथी मारल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. पश्चिम महाराष्ट्रात २२ टक्के तोट्यातील मार्गावरही बस चालविल्या जात आहेत. तर दुसरीकडे विदर्भात मात्र ८ टक्के तोट्यातील मार्गावरच बस चालवल्या जात आहेत. वाहनांची देखभाल दुरुस्ती सुद्धा प्रभावित झाली आहे, कारण एकूण ७७७ मंजूर पदांपैकी ३०० पदे रिक्त आहेत. एसटी बसेसच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही प्रतिकूल परिणाम पडला असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचप्रकारे भाजपाचे सदस्य सरदार तारासिंह यांनी त्यांच्या मुलुंड येथील मतदारसंघात रात्री चालणाऱ्या बीअर बारचा मुद्दा उपस्थित केला. या बीअर बारमध्ये मुलींचे मृत्यू होत असल्याचेही त्यांनी लक्षात आणून दिले. बीअर बार रात्री ११ वाजता बंद व्हायला हवे़ परंतु रात्री उशिरापर्यंत ते सुरू राहतात, असे लक्षात आणून दिले.
शिवसेनेचे सदस्य डॉ. सुचित मिणचेकर यांनी पोलीस विभागातील महत्त्वाची शाखा असलेल्या फिंगर प्रिंट विभागाकडे होत असलेल्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधले. येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांना कुठल्याही सुविधा दिल्या जात नाहीत. इतकेच नव्हे तर त्यांना खाकी ड्रेस सुद्धा दिले जात नाही. या विभागात मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. अतिशय महत्त्वाचा विभाग असलेल्या या विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून त्यांच्या समस्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. दीपिका चव्हाण यांनी त्यांच्या मतदारसंघातील एका शाळेद्वारा विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क वसूल करण्यापासून थांबवण्याची मागणी केली. प्रताप सरनाईक यांनी दहनघाट, सुनील शिंदे यांनी इमारतींची प्रश्न उपस्थित केला.