औरंगाबादेत ‘द बर्निंग ट्रेन’
By Admin | Updated: October 27, 2014 02:16 IST2014-10-27T02:16:20+5:302014-10-27T02:16:20+5:30
नांदेड-मनमाड पॅसेंजरला शनिवारी मध्यरात्री औरंगाबादेतील मिटमिटा परिसरात आग लागली. हा प्रकार लक्षात येताच रेल्वे गार्ड व पॉइंटस्मनने दाखविलेल्या सतर्कतेमुळे सुदैवाने मोठी जीवित हानी टळली

औरंगाबादेत ‘द बर्निंग ट्रेन’
औरंगाबाद : नांदेड-मनमाड पॅसेंजरला शनिवारी मध्यरात्री औरंगाबादेतील मिटमिटा परिसरात आग लागली. हा प्रकार लक्षात येताच रेल्वे गार्ड व पॉइंटस्मनने दाखविलेल्या सतर्कतेमुळे सुदैवाने मोठी जीवित हानी टळली. आग लागल्यानंतर या बोगीतील प्रवाशांनी धावत्या रेल्वेतून उड्या मारल्या. त्यामुळे काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. या आगीत रेल्वेची अख्खी एक बोगी जळून खाक झाली. आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तपासासाठी तातडीने चार सदस्यीय चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे.
शनिवारी रात्री १ वाजून ३५ मिनिटांनी नांदेड-मनमाड पॅसेंजर औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर आली व १० मिनिटांच्या थांब्यानंतर ती पुढील प्रवासासाठी रवाना झाली. इंजिनसह ११ बोगी (डबे) असलेल्या या गाडीत हजाराच्या वर प्रवासी होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान २ बंब घेऊन घटनास्थळाकडे निघाले. मात्र, रस्ताच नसल्याने घटनास्थळापर्यंत पोहोचण्यास चांगलीच कसरत करावी लागली. एक तास परिश्रम घेऊन जवानांनी ही आग विझविली; परंतु तोपर्यंत सांगाड्याशिवाय बोगीत काहीच शिल्लक राहिले नव्हते. (प्रतिनिधी)