बंधारा घोटाळ्यात नेत्यांनीही धुतले हात

By Admin | Updated: November 18, 2014 00:57 IST2014-11-18T00:57:27+5:302014-11-18T00:57:27+5:30

राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या नागपूर जिल्हा परिषदेच्या बंधारा घोटाळा प्रकरणात गुन्हे दाखल झाल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. यातीलच एक म्हणजे, बंधारा घोटाळ्यात काही नेत्यांनीही हात

Bundra scandal leaders also wash their hands | बंधारा घोटाळ्यात नेत्यांनीही धुतले हात

बंधारा घोटाळ्यात नेत्यांनीही धुतले हात

सुरुवातच गैरप्रकाराने : निर्ढावलेपणाची मासलेवाईक उदाहरणे
नरेश डोंगरे - नागपूर
राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या नागपूर जिल्हा परिषदेच्या बंधारा घोटाळा प्रकरणात गुन्हे दाखल झाल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. यातीलच एक म्हणजे, बंधारा घोटाळ्यात काही नेत्यांनीही हात धुतल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे संबंधित नेते तपास यंत्रणेच्या रडारवर आले आहेत.
विदर्भातील शेती निसर्गावर अवलंबून आहे. येथे सिंचनाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पिकांना पाणी मिळावे अन् शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा म्हणून बंधारे बांधकामाची योजना राबविली जाते. याच कल्पनेतून नागपूर जिल्हा परिषदेकडून ३० बंधारे बांधकामासाठी २००६-०७ मध्ये २.५८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र भ्रष्ट यंत्रणेने या योजनेचे खोबरे करून ते वाटून खाल्ले.
काटोल आणि नरखेड तालुक्यात बंधारे बांधकामाच्या अंमलबजावणीची प्रारंभिक प्रक्रियाच मुद्दामहून चुकीच्या पद्धतीने करण्यात आली. एवढेच काय भ्रष्टाचार किती निर्ढावलेपणाने करावा, त्याचे मासलेवाईक उदाहरणच या घोटाळ्यातून पुढे केले.
कोट्यवधींच्या हे काम दर्जेदार व्हावे, यासाठी त्याचा जास्तीतजास्त गाजावाजा करून चांगल्या कंत्राटदारांना बांधकाम केले जाणार, याची माहिती द्यायला हवी होती, मात्र तसे झाले नाही. कोट्यवधींच्या बांधकामाचा गाजावाजा होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात आली. म्हणूनच जिल्हा परिषदऐवजी ग्रामपंचायत स्तरावरून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. दुसरे म्हणजे, जे कंत्राटदार काळ्या यादीत (ब्लॅक लिस्टेड) होते, त्यांनाच या बंधाऱ्याचे बांधकाम देण्यात आले. कळस म्हणजे, नियोजित मुदतीपूर्वीच निविदा उघड (टेंडर लीक) करण्यात आल्या होत्या, असेही संबंधित सूत्रांना कळले आहे.
बांधकामाची लाखोंची बिले अदा करण्यापूर्वी आवश्यक तपासणी, नोंदी आणि शेरे मिळायला हवे. मात्र, या बांधकामाच्या नोंदी किंवा नोंदीचे रजिस्टर चेक करण्याच्या कुणी भानगडीतच पडले नाही. त्यामुळेच ठरवून आणि निर्ढावलेपणाने बंधारा कामात गैरप्रकार करण्यात आल्याचे तपास यंत्रणेचे मत बनले आहे. भक्कम राजकीय आधार असल्याशिवाय अधिकारी किंवा कंत्राटदार असा निर्ढावलेपणा दाखवू शकत नाही. याची खात्री असल्यामुळे निर्ढावलेल्या आरोपींच्या मागे कोण आहेत, ते शोधण्यासाठी तपास यंत्रणा कामी लागली आहे.

Web Title: Bundra scandal leaders also wash their hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.