ओरिएंटल इन्शुरन्सला ग्राहक मंचचा दणका
By Admin | Updated: September 7, 2015 01:00 IST2015-09-07T01:00:31+5:302015-09-07T01:00:31+5:30
विमा पॉलिसीमध्ये प्लँट व मशिनरी हे विषय समाविष्ट असूनही नुकसानभरपाईची रक्कम तक्रारदाराला न दिल्याने स्टॅण्डर्ड फायर आणि स्पेशल पेरील पॉलिसीअंतर्गत

ओरिएंटल इन्शुरन्सला ग्राहक मंचचा दणका
ठाणे : विमा पॉलिसीमध्ये प्लँट व मशिनरी हे विषय समाविष्ट असूनही नुकसानभरपाईची रक्कम तक्रारदाराला न दिल्याने स्टॅण्डर्ड फायर आणि स्पेशल पेरील पॉलिसीअंतर्गत १८ लाख ५४ हजार १९३ रुपये तक्रार दाखल तारखेपासून ६ टक्के व्याजासह तक्रारदाराला द्यावे, असे आदेश ग्राहक तक्रार निवारण मंचाने ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला दिले आहेत.
रामदेव सिझर्स ही एक बांधकामासंबंधीची फर्म असून त्यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून ३ करोड ५० लाख रुपयांचा विमा उतरविला होता. त्यानंतर, २० डिसेंबर २००९ रोजी शॉर्टसर्किटमुळे आग लागून फर्मचे ४४ लाख ५५ हजार ६५४ एवढ्या रकमेचे नुकसान झाले. त्यानंतर, इन्शुरन्स कंपनीच्या सर्वेअरने नुकसान रक्कम १७ लाख ५० हजार निश्चित केली. मात्र, सर्वेअरने दिलेल्या अहवालात तक्रारदारांनी साठवणूक नोंदी दाखविल्या नाहीत. तक्रारदारांनी पॉलिसी घेताना प्रपोजल फॉर्ममध्ये प्लँट व मशिनरीकरिता १ करोड रकमेची रिस्क घेतल्याचे नमूद केले आहे. परंतु, इन्शुरन्स कंपनीने पॉलिसीमध्ये मशिनरीचा समावेश केला नाही. त्यानंतर, तक्रारदारांनी याबाबत विमा कंपनीला पत्राद्वारे माहिती दिली होती. त्याप्रमाणे कंपनीने मशिनरी पॉलिसीप्रमाणे समाविष्ट असल्याबाबत नोंद करून चुकीची दुरुस्ती केली. तसेच आग लागल्यानंतरही तक्रारदारांनी आगीच्या घटनेची माहिती विमा कंपनीला दिली होती. मात्र, तक्रारदाराने वेळोवेळी कागदपत्रांची मागणी करूनही ते उपलब्ध केले नाहीत.