‘बिग बी’च्या घरात शिरला ‘बुलेट’ फॅन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2016 05:39 IST2016-08-02T05:39:22+5:302016-08-02T05:39:22+5:30
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घरी रविवारी शाहरूख खानच्या ‘फॅन’ चित्रपटासारखाच काहीसा प्रसंग घडला.

‘बिग बी’च्या घरात शिरला ‘बुलेट’ फॅन
मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घरी रविवारी शाहरूख खानच्या ‘फॅन’ चित्रपटासारखाच काहीसा प्रसंग घडला. गाणी ऐकविण्याचे कारण सांगत, एक तरुण जुहूतील अमिताभ यांच्या ‘जलसा’ या बंगल्यात शिरला. सुरक्षारक्षकांनी वेळीच प्रसंगावधान राखून त्याला पकडले. या तरुणाला अटक करण्यात आली आहे.
बुलेट बलिंदर यादव (२३) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा बिहारचा आहे. पुण्याच्या नेहरूनगर परिसरात एका कन्स्ट्रक्शन साइटवर तो काम करतो. जुहू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी एक ते दोनच्या सुमारास यादव हा अमिताभ यांच्या ‘जलसा’ या बंगल्यात सुरक्षारक्षकांची नजर चुकवत शिरला. रविवारी या बंगल्यासमोर बिग बींना पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्याची गर्दी असते. याचाच फायदा घेत, तो जलसाच्या भिंतीवर चढून बंगल्यात घुसला. मुख्य म्हणजे, त्यावेळी बिग बी हे बंगल्यातच होते. मात्र, ही बाब वेळीच सुरक्षारक्षकांच्या लक्षात आली. त्यांनी याची सूचना जुहू पोलिसांना दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी यादवला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.
आपण बच्चन यांचे फॅन असून, त्यांना माझ्या भोजपुरी गीतरचना दाखविण्यासाठी आल्याचे अटक केलेल्या तरुणाने पोलिसांना सांगितले. यादवला रविवारी अटक करण्यात आली असून, त्याला सात दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आल्याचे जुहूचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घोसाळकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्याचे
वडील मुलुंड परिसरात राहतात. मात्र, त्यांची परिस्थिती हलाखीची
आहे. त्यामुळे जामिनासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याचे पोलिसांना सांगितले. (प्रतिनिधी)
>‘जलसा’च्या
सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
अमिताभ यांच्या घरात अनोळखी व्यक्तीने शिरण्याची ही पहिली वेळ नाही. २०१२ मध्येदेखील स्वत:ला फॅन म्हणवणारा एक इसम ‘जलसा’मध्ये अशाच प्रकारे शिरला होता, ज्याने बिग बी यांच्या बेडरूमपर्यंत मजल मारत काही मौल्यवान वस्तूंची चोरी केली होती. मात्र, जुहू पोलिसांनी इंदूरमधून त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या.