रोह्यात बिल्डरने केली १८ जणांची फसवणूक

By Admin | Updated: March 2, 2017 03:07 IST2017-03-02T03:07:25+5:302017-03-02T03:07:25+5:30

गाळेधारकांकडून सुमारे दोन कोटी रुपये इतकी रक्कम घेणाऱ्या बिल्डरकडे वारंवार तगादा लावूनदेखील संबंधित बिल्डरने दुर्लक्ष केले

Builder has cheated 18 people in Roha | रोह्यात बिल्डरने केली १८ जणांची फसवणूक

रोह्यात बिल्डरने केली १८ जणांची फसवणूक


रोहा : अल्प मुदतीत सदनिका व गाळे बांधून देत असल्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून रोख रक्कम व त्यांच्या नावे सरकारी बँकेतून कर्ज मंजूर करून मंजूर कर्जाची रक्कम बँकेतून काढून सुमारे १८ सदनिकाधारक व गाळेधारकांकडून सुमारे दोन कोटी रुपये इतकी रक्कम घेणाऱ्या बिल्डरकडे वारंवार तगादा लावूनदेखील संबंधित बिल्डरने दुर्लक्ष केले. या प्रकरणी फसवणूक झालेल्या संतप्त सदनिकाधारक व गाळेधारकांनी पोलिसांत धाव घेत भामट्या बिल्डर विरोधात तक्रार दाखल केली
आहे.
फसवणूक झालेल्या १८ जणांत पोलीस कर्मचारी, महसूल खात्यातील सेवानिवृत्त अधिकारी, आरोग्यसेविका, बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स, एमआयडीसी व इतर खासगी कंपनीत काम करणाऱ्या कामगारांचा समावेश आहे. सदनिका व गाळेधारकांना कोटींचा चुना लावून गंडा घालणारा बिल्डर अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड येथील दत्तवैभव बिल्डिंग येथे राहणारे हरिश्चंद्र नथुराम माळी या बिल्डर विरोधात मालकी हक्काच्या सदनिका बांधण्यास प्रोत्साहन देणे, विक्री व्यवस्थापन व हस्तांतरण यांचे नियमन व अधिनियमातील कलमान्वये गुन्हा दाखल केलाआहे. बिल्डर हरिश्चंद्र माळी याने रोहा-चणेरा मार्गावरील म्हाडा कॉलनी लगत रोशनपार्क या बिल्डिंगमध्ये सुसज्ज सदनिका व गाळे बांधून देत असल्याचे आश्वासन देऊन १८ जणांचा करारनामा तयार केला. काही जणांनी रोख रक्कम जमा केली. तरी बहुतांश जणांनी कोलाड येथील बँक आॅफ महाराष्ट्र या सरकारी बँकेतून कर्ज मंजूर करून व कर्जापोटी मंजूर झालेली रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरून गाळेधारक, सदनिकाधारक यांनी करारनाम्याप्रमाणे मर्यादित वेळेत गाळे व ब्लॉक तयार न केल्याने संबंधितांनी बिल्डरकडे तगादा लावला. संबंधित बिल्डरकडून फसवणूक झाल्याची खात्री होताच या सर्व सदनिका व गाळेधारकांनी पोलिसांत धाव घेतली. (वार्ताहर)
विरझोली येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश धुमाळ यांनी या बिल्डरकडे झालेल्या करारापोटी १२ लाख २५ हजार रूपये दिले असताना नियोजित वेळेत बिल्डिंगचे कामकाज पूर्ण न केल्याने धुमाळ यांनी तक्रार दाखल केली आहे. त्याचप्रमाणे मागील दोन वर्षांत अनेक सदनिकाधारक व गाळेधारकांची फसवणूक झाली आहे.त्याचप्रमाणे मागील दोन वर्षांत ठरल्याप्रमाणे इतर सदनिकाधारक व गाळेधारक यांचादेखील रोशनपार्क बिल्डिंगमध्ये रक्कम घेऊन ताबा न दिल्याने इतरांनीही पोलिसांत बिल्डर विरोधात तक्र ार दिली आहे.बिल्डर हरिश्चंद्र माळी याने स्वत:च्या फायद्यासाठी कर्जापोटी मंजूर झालेली रक्कम वापरली, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बांधकाम व्यवसाय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पुढील तपास पो.नि. निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. आर. आर. भोनकर करीत आहेत.

Web Title: Builder has cheated 18 people in Roha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.