बिल्डर फसवणुकीची एसआयटी कल्याणमध्ये कागदावरच
By Admin | Updated: June 8, 2016 02:29 IST2016-06-08T02:29:51+5:302016-06-08T02:29:51+5:30
स्वस्त घरांचे प्रलोभन दाखवून कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांची ३५ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली.

बिल्डर फसवणुकीची एसआयटी कल्याणमध्ये कागदावरच
मुरलीधर भवार,
कल्याण- स्वस्त घरांचे प्रलोभन दाखवून कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांची ३५ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. विविध पोलीस ठाण्यांत फसवणुकीचे २० गुन्हे दाखल झाल्याने पोलीस उपायुक्तांनी त्याच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याची घोषणा केली. त्याला सहा महिने उलटले, तरी या गुन्ह्यांचा तपास अजूनही झालेला नाही. त्यामुळे फसवणूक झालेल्या नागरिकांना न्याय मिळणार का, त्यांनी गुंतविलेले पैसे परत मिळणार का, याचे उत्तर मिळालेले नाही. बिल्डरांवर कारवाईत पोलिसांचे हात अचानक बांधले गेल्याने फसवले गेलेले नागरिक पोलीस ठाण्याचे उंबरे झिजवत आहेत.
गेल्या वर्षभरात स्वस्त घरांचे प्रलोभन दाखवून विविध बिल्डरांनी बेकायदा घरविक्रीची दुकाने थाटली होती. नागरिकांकडून घराच्या बदल्यात बुकिंगचे पैसे घेतले. पण घरे न दिल्याने, पैसेही परत न केल्याने महात्मा फुले चौक पोलीस ठाणे आणि कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आतापर्यंत २० गुन्हे दाखल झाले आहेत.
या गुन्ह्यात दोन हजार ७०० नागरिकांची फसवणूक झाली आहे. विविध बिल्डरांनी त्यांना जवळपास ३५ कोटीपेक्षा जास्त रुपयांना गंडा घातला आहे. ‘स्वस्तिक’, ‘गजानन होम्स’ आणि ‘आकृती बिल्डर’ यांनी कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याने त्यांची स्थानिक पोलीस ठाणे आणि आर्थिक गुन्हे शाखा अशा दोन्ही पातळीवर चौकशी सुरू आहे. पोलिसांनी आतापर्यंत विविध गुन्ह्यांत ३९ जणांना अटक केली आहे. त्यांची बँक खाती सील केली आहेत. नागरिकांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत.
‘स्वस्तिक’, ‘गजानन होम्स’ आणि ‘आकृती बिल्डर’ व्यतिरिक्त ‘एव्हरेस्ट’, ‘ओमसाई’, ‘त्रिमूर्ती’, ‘उमंग’, ‘पांडू’, ‘एकविरा’, ‘साईकृपा’, ‘आमंत्रण’, ‘साई लीला’, ‘आशीर्वाद’, ‘शुभारंभ’, ‘सनसिटी’, ‘मंगलमूर्ती’ आणि ‘ओंकार’ या बिल्डरांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. २० गुन्ह्यांपैकी ‘गजानन होम्स’, ‘ओमसाई’, ‘आकृती’, ‘त्रिमूर्ती’, ‘ग्रीनसिटी’ आणि ‘आशीर्वाद’ या सहा बिल्डरांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
या बिल्डरांनी अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी येथील ब्रिटिशकालीन विमानतळाच्या जागेवर बेकायदा घरे उभारली होती. ही जागा सध्या हवाई दलाच्या ताब्यात आहे. यातील काही घरे सॅम्पल म्हणूनही दाखविण्यात आली. धनादेश आणि रोख रक्कम घेऊन बिल्डरांनी नागरिकांची फसवणूक केली. पाच लाखांत वन बीएचके देण्याचे प्रलोभन दाखवण्यात आले होेते. ‘ओमसाई बिल्डर’ने फसवणूक केल्याप्रकरणी सुनील पोटे याला अटक झाली होती. त्याने नागरिकांकडून उकळलेल्या पैशातून पनवेल, मुंबई, पुणे, सातारा या परिसरात जमीन घेतली होती. टिटवाळा परिसरात पोटेने फसवणूक केल्याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्याआधी कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली होती. पोटे याच्या भावाला त्याच्या आधीच पनवेलमधील ‘स्वप्ननगरी होम्स’मध्ये फसवणूक केल्याप्रकरणी अटक झाली होती. तो न्यायालयीन कोठडीत होता.
विधिमंडळातही
गाजला मुद्दा
बिल्डरकडून फसवणूक झालेल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी तत्कालीन पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी डिसेंबर २०१५ मध्ये एसआयटी नेमली होती.
त्याबाबतचा मुद्दा कल्याण-डोंबिलीतील आमदारांनी हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला होता. त्यामुळे पोलिसांना एसआयटी नेमावी लागली होती.
मात्र, या एसआयटीने फारसे समाधानकारक काम केलेले नाही. तपास संथ गतीने सुरू असल्याचा आरोप फसवणूक झालेल्या नागरिकांकडून होत आहे. सहा महिने उलटून गेले तरी त्यांना न्याय मिळालेला नाही.
जाहिराती पुन्हा झळकल्या, कार्यालयेही सुरू
फसवणुकीची प्रकरणे समोर आली तेव्हा शहरातील स्वस्त दरात घर देण्याच्या जाहिराती करणाऱ्या बिल्डरांच्या कार्यालयांची झाडाझडती घेण्याचे सत्र सुरू झाले होते.
काही कार्यालये बंद करण्यात आली होती. तर काहींनी स्वत:च कुलूप लावून धूम ठोकली होती.
आता काही ठिकाणी पुन्हा या जाहिराती झळकू लागल्या आहेत. त्यांची कार्यालयेही पाहायला मिळत आहेत.
>‘मोक्का’साठी गाइडलाइन नाही
विधिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात बेकायदा बांधकाम प्रकरणासह बिल्डरांकडून फसविलेल्या गेलेल्यांचा मुद्दा उपस्थित झाला होता. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फसवणूक करणाऱ्या बिल्डरांविरोधात ‘मोक्का’अन्वये कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले होते.
त्यामुळे या २० बिल्डरांविरोधात ‘मोक्का’ लावला जाईल का, असा सवाल तपास यंत्रणेतील काहींना विचारला असता त्यांनी तशा पद्धतीच्या कोणत्याही गाइडलाइन आलेल्या नाहीत, असे सांगितले.
एका अधिकाऱ्याने ‘मोक्का’ का लावला जाऊ नये, असा सवाल करून तो लावला जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. नवे पोलीस उपायुक्त फसवणुकीचा तपास गतीमान करतील, अशी अपेक्षाही पोलिसांनी आणि फसवल्या गेलेल्या नागरिकांनी व्यक्त केली जात आहे.