ब्रसेल्समध्ये जखमी झालेल्या निधी परतल्या
By Admin | Updated: May 7, 2016 02:17 IST2016-05-07T02:17:34+5:302016-05-07T02:17:34+5:30
बेल्जियमची राजधानी असलेल्या ब्रसेल्स बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या जेट एअरवेजच्या कर्मचारी निधी चाफेकर शुक्रवारी मुंबईत परतल्या. सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी

ब्रसेल्समध्ये जखमी झालेल्या निधी परतल्या
मुंबई : बेल्जियमची राजधानी असलेल्या ब्रसेल्स बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या जेट एअरवेजच्या कर्मचारी निधी चाफेकर शुक्रवारी मुंबईत परतल्या. सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी त्या सांताक्रूझ विमानतळावर दाखल झाल्या. निधी यांना पुढील उपचारासाठी ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी निधी आपल्या कुटुंबीयांना काही वेळासाठी हॉटेलमध्ये भेटल्या. पती रूपेश, मुलगा वर्धन (१४) आणि मुलगी वृषी (११) व निधी यांची जवळपास दीड महिन्यानंतर भेट झाली.
निधी यांच्या वहिनी माधुरी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, भविष्यातही निधीवर उत्तम उपचार व्हावे याकरिता आवश्यक ती मदत करण्यात येईल, अशी माहिती जेट एअरवेजच्या प्रवक्त्यांनी दिली. (प्रतिनिधी)
ब्रसेल्स हल्ल्याचा चेहरा
२२ मार्च रोजी ब्रसेल्स विमानतळावर दहशतवाद्यांनी दोन हल्ले केले. त्यावेळी निधी नेवॉर्कला जाण्यासाठी ब्रसेल्स विमानतळावर उपस्थित होत्या. यात निधी गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले.
या हल्ल्यात त्या १५ टक्के भाजल्या होत्या. त्यावेळी त्यांना ब्रसेल्स येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. निधी जवळपास २५ दिवस कोमात होत्या. या दरम्यान त्यांच्या शरीरावरील त्वचेचे ग्राफ्टिंग करण्यात आले.
गुरुवारी तेथील स्थानिक रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर त्यांना पॅरिस येथे आणण्यात आले. तेथून निधी मुंबईला आल्या. हल्ल्यानंतर काही क्षणांत निधी यांचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला होता.