भाई बर्धन : सच्चा सेवक
By Admin | Updated: January 18, 2015 00:58 IST2015-01-18T00:58:07+5:302015-01-18T00:58:07+5:30
१९४८ तो काळ असावा, त्यावेळी ए.बी.बर्धन विद्यार्थी दशेत होते. तेव्हापासूनच त्यांचा कामगार केसरी रामभाऊ रुईकर यांच्याशी संबंध आला. रुईकरांसोबत त्यांनी कामगारांच्या अनेक सभांना संबोधित केले होते.

भाई बर्धन : सच्चा सेवक
मालती रुईकर
१९४८ तो काळ असावा, त्यावेळी ए.बी.बर्धन विद्यार्थी दशेत होते. तेव्हापासूनच त्यांचा कामगार केसरी रामभाऊ रुईकर यांच्याशी संबंध आला. रुईकरांसोबत त्यांनी कामगारांच्या अनेक सभांना संबोधित केले होते.
पुलगावला गिरणी कामगारांची सभा होती. बर्धन तेव्हा नुकतेच कामगार चळवळीत रुळायला लागले होते. सभेला कामगारांची संख्या कमी असल्याने रुईकरांनी बर्धन यांना बोलण्यास सांगितले. ते कमालीच्या हळू आवाजात बोलत होते. त्यामुळे सभेत जोश येत नव्हता.
वारंवार सांगूनही बर्धन यांचा आवाज वाढत नसल्याचे पाहून अखेर रुईकरांनीच सभेचा ताबा घेतला आणि तडाखेबंद भाषण ठोकले. पाहता पाहता कामगारांची गर्दी हजारोच्या संख्येने वाढली. ‘सभेला किती लोक आहेत त्या पेक्षा तुम्ही त्यांच्याविषयी काय बोलता यावर सभेचे महत्त्व ठरते आणि गर्दीही वाढते’, असा मंत्र यावेळी रुईकर यांनी बर्धन यांना दिला. त्याचे पालन अद्यापही ते करीत आले आहेत. पुढच्या काळात बर्धन यांनी स्वतंत्र कामगार संघटना उभ्या केल्या. अनेक वर्ष ते गिरणी कामगारांच्या लढ्यात सक्रिय सहभागी झाले. कामगारांच्या न्याय्य हक्काच्या लढ्यासाठी कळकळीने सहभागी होण्याची त्यांची वृत्ती चळवळीशी त्यांचे प्रामाणिक नाते दर्शविणारी आहे. कामगार लढ्यातून श्रमिकांना न्याय मिळाला असेल तर मग ते त्याचे श्रेय स्वत:कडे कधीच घेत नाहीत.
(लेखिका या कामगार नेत्या आणि कामगार केसरी दिवंगत रामभाऊ रुईकर यांच्या कन्या आहेत.)
एक सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकीय कारकीर्द सुरु करून कर्तृत्त्वाने पक्षाच्या सर्वोच्चपदापर्यंत पोहोचणारे, नागपूरच्या कामगार क्षेत्रावर आपल्या कामाचा ठसा उमटविणारे आणि नागपूरकरांसाठी ‘भूषण’ ठरलेले भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, पक्षाचे माजी सरचिटणीस आणि ज्येष्ठ कामगार नेते भाई अर्धेन्दु बर्धन यांनी ९० व्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त त्यांचा आज रविवारी दि.१८ जानेवारी २०१५ रोजी सत्कार करण्यात येत आहे. त्यानिमित्त त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि कामगार क्षेत्रातील निर्लेप सेवेला लोकमतने केलेला हा सलाम.