कूळ कायद्याच्या लढ्यातील आठवणींना उजाळा
By Admin | Updated: August 29, 2016 05:11 IST2016-08-29T05:11:48+5:302016-08-29T05:11:48+5:30
खोती पद्धत रद्द करून शासनाला कूळ कायदा बनविण्यास भाग पाडणारे शेतकरी नेते नारायण नागो पाटील यांच्या स्मृती प्रकल्पग्रस्तांना लढण्याच्या प्रेरणा देत आहेत.

कूळ कायद्याच्या लढ्यातील आठवणींना उजाळा
नामदेव मोरे, नवी मुंबई
खोती पद्धत रद्द करून शासनाला कूळ कायदा बनविण्यास भाग पाडणारे शेतकरी नेते नारायण नागो पाटील यांच्या स्मृती प्रकल्पग्रस्तांना लढण्याच्या प्रेरणा देत आहेत. चरी कोपरचा ऐतिहासिक सहा वर्षांचा संप व त्यानंतर शासनाला कायदा करण्यास भाग पाडणाऱ्या या नेत्याच्या आठवणींना त्यांच्या जयंतीनिमित्त उजाळा दिला जात आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात कोकणामध्ये जमीन कसणाऱ्या कुळांची खोतांकडून पिळवणूक होत होती. या पिळवणुकीतून शेतकऱ्यांची सुटका करणाऱ्या नारायण नागू पाटील यांची २९ आॅगस्टला १२४ वी जयंती. शेतकऱ्यांच्या हितासाठी जीवनभर लढणाऱ्या या नेत्याची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष होत आहे. या निमित्ताने प्रथमच नवी मुंबई, पनवेलमधील प्रकल्पग्रस्त तरूण त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. त्यांनी घडवून आणलेल्या आंदोलनाच्या कथा सोशल मीडियातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचवून अनोखी श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. जगातील सर्वात मोठा शेतकऱ्यांचा संप या नेत्याने घडवून आणला होता. कोकणामध्ये अन्यायकारक खोती पद्धतीविरोधात त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र केले. २७ सप्टेंबर १९३३ मध्ये चरी कोपरमध्ये २५ गावांमधील शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात याच लढ्यात शेतकऱ्यांना संपावर जाण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांना उत्पन्नातील योग्य वाटा मिळत नसल्यामुळे त्यांनी संपावर जावे असे क्रांतिकारी निर्णय घेण्यात आले. ज्यांचे आयुष्य शेतीवर अवलंबून आहे त्यांनी शेती करणेच बंद केले.
खोतांना वाटले किती दिवस आंदोलन सुरू राहील. खायला अन्न मिळेना की संप मागे घेतला जाईल. परंतु शेतकरी निर्णयावर ठाम राहिले. शहरात जावून मिळेल ते काम केले. महिलांनी भांडी - धुण्याचे काम केले. या आंदोलनाची दखल घेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चरीला जावून आंदोलकांची भेट घेतली. जुलूम बंद पाडण्यासाठी कायदा करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले व त्यांनी कूळ कायदा करण्यास शासनास भाग पाडले. अखेर १९३९ मध्ये हा संप मागे घेण्यात आला.