‘अविश्वास आणा; बहुमत सिद्ध करू’
By Admin | Updated: November 13, 2014 01:46 IST2014-11-13T01:46:13+5:302014-11-13T01:46:13+5:30
आमच्या सरकारला बहुमत नाही, असे काँग्रेसला वाटत असेल तर त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणावा आम्ही बहुमत सिद्ध करून दाखवू, असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
‘अविश्वास आणा; बहुमत सिद्ध करू’
मुंबई : आमच्या सरकारला बहुमत नाही, असे काँग्रेसला वाटत असेल तर त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणावा आम्ही बहुमत सिद्ध करून दाखवू, असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, सरकारकडे बहुमत नाही असे कोणाला वाटत असेल तर अविश्वास प्रस्तावाचा मार्ग मोकळा आहे. त्यांनी तो आणावा. आम्ही त्यांना घाबरत नाही, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री असेही म्हणाले की, पद्धत आणि परंपरेनुसार विश्वासदर्शक ठरावावर आवाजी मतदान होते. आधीही अनेकदा तसे विधानसभेत झालेले आहे. भाजपाने विश्वास ठराव मांडल्यानंतर अध्यक्षांनी तो आवाजी मतदानाला टाकला होता. तेव्हा मतदान हवे होते तर तशी मागणी एखाद्या पक्षाने करायला हवी होती पण ती कोणीही केली नाही. ठराव मंजूर झाल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले. त्यानंतर अध्यक्ष विरोधी पक्षनेत्याच्या निवडीची घोषणा करीत असताना काही विरोधी पक्ष सदस्य विश्वास ठरावावर मतदानाची मागणी करू लागले पण तोवर कामकाज पुढे गेलेले होते आणि नियमानुसार ते मागे नेणो शक्य नव्हते. सभागृहात मतदान व्हायला हवे होते असा कांगावा आता करीत असलेले सदस्य जेव्हा त्यांना सभागृहात तशी संधी होती, तेव्हा काय करीत होते, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)