नेरळ स्थानकातील पूल अर्धवट

By Admin | Updated: June 29, 2016 02:43 IST2016-06-29T02:43:36+5:302016-06-29T02:43:36+5:30

माथेरानला जाण्यासाठी नेरळ रेल्वे स्थानकावर उतरावे लागते, त्यामुळे नेरळ स्थानकाला विशेष महत्त्व आहे.

The bridge in the Neel Station is partially | नेरळ स्थानकातील पूल अर्धवट

नेरळ स्थानकातील पूल अर्धवट


कर्जत : माथेरानला जाण्यासाठी नेरळ रेल्वे स्थानकावर उतरावे लागते, त्यामुळे नेरळ स्थानकाला विशेष महत्त्व आहे. मात्र हे रेल्वे स्थानक अनेक सुविधांपासून वंचित आहे. मध्य रेल्वेच्या कर्जत एन्डकडील नेरळ या जंक्शन उपनगरीय रेल्वे स्थानकात नवीन पादचारी पुलाचे काम रेल्वेने सुरू केले आहे. ब्रिटिशकाळापासून असलेला पादचारी पूल जुना झाल्याने हा नवीन पादचारी पूल मंजूर करण्यात आला आहे. मात्र २००४ मध्ये बांधकाम सुरु करण्यात आलेल्या अर्धवट अवस्थेत असलेल्या पादचारी पुलाचे काय, असा प्रश्न रेल्वे प्रवासी संघटनेने उपस्थित केला आहे.
नेरळ रेल्वे स्थानकातून माथेरान या पर्यटनस्थळी जाण्यासाठी नॅरोगेज मार्ग आहे. त्यामुळे जंक्शन रेल्वे स्थानक असलेल्या नेरळ स्थानकाला पर्यटनदृष्ट्या महत्त्व आहे. त्याचवेळी मुंबईचे उपनगर म्हणून झपाट्याने नेरळ विकसित होत असल्याने रेल्वे प्रशासनाने येथील प्रवाशांच्या गर्दीचा विचार करून नवीन पादचारी पूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या स्थानकात ब्रिटिशकाळात उभारलेला पादचारी पूल असून २००३ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री नितीश कुमार माथेरानला जात असताना नेरळ स्थानकात काही काळ थांबले. त्यावेळी नेरळकरांच्या मागणीनंतर संगणकीय तिकीट आरक्षण केंद्र आणि पादचारी पुलाची घोषणा केली होती. त्यानंतर महिन्यातच आरक्षण केंद्र सुरु झाले आणि पादचारी पुलाचे काम काही महिन्यांनी सुरु झाले. मुंबई एन्डकडे नव्याने बांधकाम सुरु केलेल्या पादचारी पुलाचे दोन्ही बाजूचे पिलर २००४ च्या सुरु वातीला उभे राहिले. रेल्वेलाइनच्या मार्गिकेवर टाकण्याचे लोखंडी साहित्य देखील येऊन पडले होते. आजपर्यंत त्या पादचारी पुलाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्याचे कारण रेल्वेकडून देताना ठेकेदार अर्धवट काम टाकून पळून गेल्याचे कारण दाखवण्यात येत आहे. त्यानंतर आजूबाजूच्या भिवपुरी रोड आणि शेलू या कमी गर्दीची स्थानके असलेल्या ठिकाणी पादचारी पुलाची उभारणी झाली होती. नेरळ स्थानकातील गर्दी आणि कर्जत एन्डकडे नवीन पादचारी पूल व्हावा, अशी मागणी प्रवासी संघटना आणि नेरळ ग्रामपंचायत करीत होती. (वार्ताहर)
>कारवाईची मागणी
दोन्ही फलाटावर नवीन पादचारी पुलाचे काम सुरु असून वर्षभरात पादचारी पूल तयार होईल, असे सांगितले जात आहे. नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेने नवीन पादचारी पुलाबद्दल रेल्वे प्रशासनाचे अभिनंदन केले आहे. मात्र अर्धवट अवस्थेतील पादचारी पुलास कारणीभूत ठेकेदार कंपनीवर कारवाईची मागणी के लीआहे. ठेकेदारावर कारवाई व्हावी म्हणून पाठपुरावा करीत राहू अशी भूमिका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संदीप म्हसकर, आदींसह पदाधिकारी राजेश गायकवाड, किसन शिंदे, आबा पवार, प्रभाकर देशमुख यांनी केली आहे.

Web Title: The bridge in the Neel Station is partially