लग्न मोडल्याने वधूपित्याची आत्महत्या
By Admin | Updated: March 3, 2015 01:13 IST2015-03-03T01:13:56+5:302015-03-03T01:13:56+5:30
विवाह ठरल्यानंतर मुलाकडील मंडळींनी आणखी जादा हुंडा व मोटारीची मागणी करीत लग्न मोडल्यामुळे आलेल्या नैराश्येतून वाकसई गावात वधूपित्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.

लग्न मोडल्याने वधूपित्याची आत्महत्या
लोणावळा : विवाह ठरल्यानंतर मुलाकडील मंडळींनी आणखी जादा हुंडा व मोटारीची मागणी करीत लग्न मोडल्यामुळे आलेल्या नैराश्येतून वाकसई गावात वधूपित्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. बाबूराव राघू येवले (वय
४८, रा़ वाकसई, ता़ मावळ) असे त्यांचे नाव आहे. सोमवारी सकाळी सहा वाजता हा प्रकार घडला.
याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी नवरदेव बाळू भागू लालगुडे (रा़ नायगाव, ता़ मावळ) याला अटक केली आहे. तसेच त्याच्यासह इतर चौघांविरुद्ध फसवणूक, आत्महत्येस प्रवृत्त करणे या कलमांतर्गंत गुन्हा दाखल केला आहे. बाबूराव यांचा शेतीवर उदरनिर्वाह आहे. त्यांच्या मुलीचा विवाह नायगाव येथील भागू लालगुडे यांच्या मुलाशी ठरला होता़ २९ जानेवारीला वाकसई येथे कुंकुम तिलकाचा कार्यक्रम झाला होता़ विवाहाची तारीख १३ एप्रिल ठरली होती़ यानुसार नायगाव येथील एक मंगल कार्यालयही बूक केले होते़ अतिशय आनंदात विवाह सोहळ्याची तयारी सुरू असताना २० फेब्रुवारीला नवरदेवाने येवले यांना फोन करून ‘मला तुमच्या मुलीशी लग्न करायचे नाही’, असे सांगत फोन बंद केला़ यानंतर येवले यांनी त्याला अनेकवेळा फोन केला; पण तो उचलत नव्हता़ यामुळे आपली फसवणूक झाली असून मुलाकडील मंडळी हुंड्यासाठी पिळवणूक करीत असल्याची तक्रार रविवारी (दि. १) बाबूराव यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती़ या सर्व प्रकारामधून नैराश्य येऊन बाबूराव यांनी सोमवारी सकाळी घराजवळच शेतावर गुरांच्या पडवीला गळफास घेऊन आत्महत्या केली़
या घटनेनंतर संतप्त झालेल्या वाकसई ग्रामस्थांनी जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेत शवविच्छेदनानंतर मृतदेह ग्रामीण पोलीस स्टेशनला आणला़ ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी नवरामुलगा बाळू लालगुडे याला अटक करीत समोर आणल्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेतला़ (वार्ताहर)
४वर पक्षाकडून लग्न मोडल्याचा फोन आल्याने बाबूराव आणि त्यांचे कुटुंब सैरभैर झाले. ज्या प्रतिष्ठित मंडळीनी हा विवाह जुळवून आणला होता, त्यांना घेऊन नायगाव येथे मुलाच्या घरी जाऊन लग्न मोडू नका अशी विनवणी केली. यावेळी सुरुवातीला विवाह मोडला असाच मुद्दा लावून धरला. नंतर विवाह करायचा असेल तर ‘आम्हाला १० तोळे सोने व चारचाकी गाडी हुंडा म्हणून द्या, नाही तर लग्न मोडले, असे समजा’ असे सांगत हाकलून दिले़