पतीसमोर प्रियकरासोबत पळाली नववधू!
By Admin | Updated: August 17, 2014 00:44 IST2014-08-17T00:44:20+5:302014-08-17T00:44:20+5:30
लग्न केले. पतीसोबत नऊ महिने सुखाचा संसारही केला. परीक्षेसाठी माहेरी गेली. १५ दिवसांनी पती न्यायला आला. प्रवासात तिने प्रियकरालाही बोलावले. इटारसी रेल्वेस्थानकावरून गाडी सुटताच प्रियकराला

पतीसमोर प्रियकरासोबत पळाली नववधू!
लोहमार्ग पोलिसात सूचना : लग्नाला झाले होते नऊ महिने
नागपूर : लग्न केले. पतीसोबत नऊ महिने सुखाचा संसारही केला. परीक्षेसाठी माहेरी गेली. १५ दिवसांनी पती न्यायला आला. प्रवासात तिने प्रियकरालाही बोलावले. इटारसी रेल्वेस्थानकावरून गाडी सुटताच प्रियकराला जवळ बोलावले. आमचे १५ वर्षांपासून एकमेकांवर प्रेम आहे, आम्ही एकमेकांशिवाय राहूूच शकत नाही, असे ती आणि तिचा प्रियकर दोघांनीही तिच्या पतीला सांगितले. मग काय थोड्याच वेळात पतीच्या डोळ्यादेखत ती प्रियकराच्या हातात हात घालून निघून गेली.
प्रमोद जीवनलाला शाहू (२९) रा. चमय्य, जि. निल्ललम हा तरुण बेंगळूरूच्या सॉफ्टवेअर कंपनीत डेव्हलपर म्हणून कामाला आहे. त्याचे नीलिमा (बदललेले नाव) या तरुणीसोबत २९ नोव्हेंबर २०१३ रोजी लग्न झाले. यातील तीन-चार महिने ती प्रमोद आणि त्यानंतर पतीच्या आईसोबत गुण्यागोविंदाने राहिली. १ मे रोजी परीक्षेच्या निमित्ताने ती आपल्या माहेरी जबलपूरला गेली. १० आॅगस्टला तिचा पती प्रमोद तिला घेण्यासाठी माहेरी गेला. चार-पाच दिवस सासूरवाडीत घालविल्यानंतर दोघेही पती-पत्नी बेंगळुरूला जाण्यासाठी निघाले. ते रेल्वेगाडी क्रमांक १२१९४ जबलपूर-यशवंतपूर एक्स्प्रेसच्या एस-५ कोचमध्ये १३ आणि १४ क्रमांकाच्या बर्थवर बसून प्रवास करीत होते. परीक्षेच्या दरम्यान माहेरी असताना नीलिमाची भेट आपल्या जुन्या प्रियकराशी झाली. दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नीलिमाने आपल्या प्रियकरालाही आपण प्रवास करीत असलेल्या गाडीत बोलविले होते. इटारसी स्टेशनवरून गाडी सुटल्यानंतर नीलिमाने आपल्या प्रियकराला बोलविले. तो येताच दोघांनीही आमचे एकमेकांवर प्रेम असल्याचे प्रमोदला बोलून दाखविले. आपण प्रियकरासोबत जात असल्याचे नीलिमाने सांगितले आणि पतीच्या डोळ्यादेखत ती आपल्या प्रियकरासोबत फुर्र झाली. (प्रतिनिधी)
सासरचे म्हणतात, मुलगी आमच्यासाठी मेली
पत्नी प्रियकरासोबत फुर्र होताच प्रमोदने आपल्या सासरच्या लोकांना मोबाईलवरून त्याची सूचना दिली. त्यावर त्यांनीही आश्चर्य व्यक्त केले. मुलीने आमचे नाक कापले आहे, त्यामुळे आता ती आमच्यासाठी मेली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रमोदजवळ दिल्याचे त्याने सांगितले.