लाचखोर अखेर जाळ्यात
By Admin | Updated: April 30, 2016 03:22 IST2016-04-30T03:22:58+5:302016-04-30T03:22:58+5:30
ठाणे अँटीकरप्शनच्या पथकाने शिवसेना गटनेता धनंजय गावडे यांना तब्बल २५ लाख रुपयांची लाच देताना गुरुवारी रात्री ठाणे येथील एका हॉटेलमध्ये रंगेहाथ अटक केली.

लाचखोर अखेर जाळ्यात
वसई : सिडकोतून प्रतिनियुक्तीवर आलेला आणि गेली आठ वर्षे वसई विरार पालिकेच्या नगररचना विभागात उपसंचालक पदावर ठाण मांडून बसलेल्या वाय. एस. रेड्डी याला ठाणे अँटीकरप्शनच्या पथकाने शिवसेना गटनेता धनंजय गावडे यांना तब्बल २५ लाख रुपयांची लाच देताना गुरुवारी रात्री ठाणे येथील एका हॉटेलमध्ये रंगेहाथ अटक केली. या अटकेनंतर वसई-विरार परिसरातील बिल्डर लॉबीचे धाबे दणाणले आहे.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा पालिकेतील गटनेता धनंजय गावडे यांनी नगररचना विभागातील गैरकारभाराची अनेक प्रकरणे उजेडात आणली आहे. नगररचना विभागात उपसंचालक पदावर असलेले वाय. एस. रेड्डी यांच्याविरोधात गावडे यांनी मुंबई हायकोर्टातही जनहित याचिका दाखल केली आहे. त्यामुळे अडचणीत आलेल्या रेड्डी यांनी गावडे यांना एक कोटी रुपयांचे आमिष दाखवले होते. याप्रकरणी गावडे यांनी ठाणे अँटीकरप्शन विभागाकडे तक्रार केली होती.
या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक अनिल होनमाने यांनी सापळा रचला होता. गुरुवारी रात्री रेड्डी पहिला हप्ता देण्यासाठी २५ लाख रुपये घेऊन ठाणे येथील वाईन अँड डाईन या हॉटेलमध्ये आला होता. त्यावेळी दबा धरून बसलेल्या अधिकाऱ्यांनी रेड्डी याला २५ लाख रुपये देताना रंगेहाथ अटक केली. अटकेनंतर अँटीकरप्शनच्या पथकाने वसई येथील रेड्डी यांच्या निवासस्थानी धाड मारली. या धाडीत दोन लाख रुपये रोख रकमेव्यतिरिक्त काही हाती लागले नाही.
शुक्रवारी सकाळी अंँटीकरप्शनच्या पथकाने वसई विरार पालिकेच्या मुख्यालयात असलेल्या नगररचना विभागाच्या कार्यालयावर धाड टाकून कागदपत्रांसह इतर चौकशी सुुरु केली. संध्याकाळी उशिरापर्यंत अँटीकरप्शनचे अधिकारी कार्यालयात चौकशी आणि तपास करीत असल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही. अंँटीकरप्शन विभागाचे एक पथक दुपारी विमानाने हैदराबाद आणि कोची येथे रवाना झाले आहे. याठिकाणी रेड्डी यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणुक करून व्यवसाय सुरु केल्याची गोपनीय माहिती मिळाल्यामुळे पथक चौकशीसाठी गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, गेली आठ वर्षे रेड्डी सिडकोतून प्रतिनियुक्तीवर वसई विरार महापालिकेत ठाण मांडून बसले आहेत. पालिकेने रेड्डी यांना पालिका सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया करून तसा ठरावही महासभेत संमत केला आहे. मात्र, सिडकोचे मूळ कर्मचारी असलेल्या रेड्डी यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुुरु असल्याने सिडकोने त्यांना सेवेतून सुट्टी देण्यास नकार दिला होता. त्यानंतरही रेड्डी प्रतिनियुक्तीवर काम करीत होते. रेड्डी यांच्याविरोधात अनेक तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. मात्र, राजकीय पाठबळ आणि बिल्डर लॉबीचा पाठिंबा असल्याने रेड्डी यांची बदली होत नव्हती. ठाण्यातील या कारवाईमुळे अनेक अधिकाऱ्यांना मोठा धक्का लागला असून या प्रकरणाची आणखी चौकशी करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
>रेड्डी यांची वसई विरार परिसरातील बड्या बिल्डरांशी अर्थपूर्ण संबंध आहेत. त्यातून त्यांनी अनेक बोगस कामे केलेली आहेत. त्यामुळे नगररचना विभागात कार्यरत असलेले ठेका अभियंता आणि इतर कर्मचारी यांच्याकडून महत्वाची कागदपत्रे व दस्तऐवज नष्ट केले जाण्याची भिती आहे. त्यांचा कार्यालयातील हस्तक्षेप थांबवून महत्वाची कागदपत्रे व दस्तऐवज सुरक्षित ठेवण्याची खबरदारी पालिका आयुक्तांनी घेतली पाहिजे. रेड्डी यांनी केलेला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार पुराव्यासह उजेडात आणणार आहोत.
- धनंजय गावडे,
तक्रारदार तथा शिवसेना गटनेता.