लाचखोर प्रभारी हिवताप अधिकारी अटकेत
By Admin | Updated: July 15, 2015 23:40 IST2015-07-15T23:40:06+5:302015-07-15T23:40:06+5:30
वाशिम जिल्ह्यातील प्रकार; कार्यमुक्त करण्यासाठी कर्मचा-यास मागितली लाच.

लाचखोर प्रभारी हिवताप अधिकारी अटकेत
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील धामणी प्राथमिक आरोग्य केंद्र येथून पोहा येथे बदली झालेल्या एका प्रयोगशाळा तंत्रज्ञास कार्यमुक्त करण्यासाठी १५00 रूपयांची लाच घेणार्या प्रभारी जिल्हा हिवताप अधिकार्यास लाचलूचपत प्रतिबंधक खात्याने (एसीबी) बुधवारी रंगेहाथ अटक केली. कारंजा तालुक्यातील धामणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत प्रयोगशाळा तंत्रज्ञाची पोहा येथे बदली झाली; तथापि धामणी येथून कार्यमुक्त करण्यासाठी प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी सुभाष म्हसाजी जाधव (वय ५७) यांनी तंत्रज्ञास कार्यमुक्त करण्यासाठी १५00 रूपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे प्रयोगशाळा तंत्रज्ञ कर्मचार्याने वाशिम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दिली. त्यानुसार, एसीबीच्या पथकाने १५ जुलै रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास जिल्हा हिवताप अधिकार्याच्या कक्षाजवळ सापळा रचला. ठरल्याप्रमाणे हिवताप अधिकार्याने तक्रारदाराकडून १५00 रूपये लाच स्विकारता एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधिक्षक महेश चिमटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधिक्षक व्ही.एम. आव्हाळे, पोलिस निरिक्षक एन.बी. बिर्हाडे यांनी केली.