भिगवण रस्त्याने घेतला मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2016 01:22 IST2016-10-17T01:22:28+5:302016-10-17T01:22:28+5:30
प्रवासी वाहने, कंटेनर तसेच अवजड वाहने हटवीत दंडात्मक कारवाई केल्याने नागरिकांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले

भिगवण रस्त्याने घेतला मोकळा श्वास
भिगवण : पुणे-सोलापूर महामार्गावरील धोकेदायक रीतीने पार्किंग केलेली प्रवासी वाहने, कंटेनर तसेच अवजड वाहने हटवीत दंडात्मक कारवाई केल्याने नागरिकांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकमत बातमीचा परिणाम होऊन भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी नीलकंठ राठोड यांनी आपल्या पोलीस फौजफाट्यासह तातडीने भेट देत ‘लोकमत’च्या बातमीमुळेच हे शक्य झाल्याचे वाचकांनी सांगितले.
पुणे - सोलापूर महामार्गावर पुणे बाजूला धोकादायक स्थितीत प्रवासी वाहने, कंटेनर तसेच अवजड वाहने पार्क केली जात होती. यातूनच महिनाभरापूर्वी गंभीर अपघात घडला होता. त्यानंतर काही दिवसांतच पुन्हा याच ठिकाणी वाहने पार्किंग करण्यास सुरवात झाली. मुख्य मार्गावरच धोकादायक स्थितीत लावलेल्या या वाहनामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे लोकमतने सामाजिक जबाबदारी ओळखून संबंधित यंत्रणांना धोक्याची जाणीव व्हावी, याविषयी रविवारी (दि. १६) बातमी प्रसिद्ध केली.
>या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत भिगवण पोलीस ठाण्याचे अधिकारी नीलकंठ राठोड यांनी आपल्या फौजफाट्यासह या जागेला भेट देऊन पाहणी करीत संबंधितांना तातडीने या ठिकाणाहून पार्किंग केलेली वाहने हटविण्याच्या सूचना करून या ठिकाणी परत वाहने पार्क करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. या ठिकाणी थांबणाऱ्या अवजड वाहनांविरोधात दंडाची कारवाई सुरू केली. या कारवाईत पोलीस अधिकारी राठोड यांच्यासोबत पोलीस श्रीरंग शिंदे, रमेश भोसले, रतिलाल चौधर, नवनाथ भागवत, महिला पोलीस सोनाली मोटे यांनी सहभाग घेतला.