आठवीपर्यंतच्या ढकलगाडीला ब्रेक
By Admin | Updated: June 10, 2016 00:49 IST2016-06-10T00:49:05+5:302016-06-10T00:49:05+5:30
शिक्षण हक्क कायद्यानुसार ‘आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास करायचे नाही,’ असा निर्णय घेण्यात आला आहे.
_ns.jpg)
आठवीपर्यंतच्या ढकलगाडीला ब्रेक
पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार ‘आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास करायचे नाही,’ असा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, शाळांकडून दहावीमध्ये निकाल वाढविण्यासाठी नववीमध्ये नापास करण्याचे प्रमाण वाढले आहे. २०१४-१५ वर्षामध्ये राज्यातील तब्बल १२.२० टक्के मुले नववीमध्ये नापास करण्यात आली. गंभीर बाब म्हणजे, नववीमध्ये शाळा सोडण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील तब्बल १६.५६ टक्के विद्यार्थ्यांनी नववीमध्येच शिक्षणाला पूर्णविराम दिला.
केंद्र शासनाने २०१४-१५च्या यू-डीआयएसईवरील अहवालानुसार राज्यातील १९ लाख ७० हजार ५१४ विद्यार्थी नववीत प्रविष्ट झाले होते. त्यातील केवळ १६ लाख ९४ हजार ५४५ विद्यार्थी दहावीत प्रविष्ट झाले होते. नववीमध्ये १० लाख ८० हजार ८४८ मुले, तर ८ लाख ८९ हजार ६६६ मुली प्रविष्ट झाल्या होत्या. तर, दहावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांची संख्या ९ लाख १३ हजार ५७३ आणि मुलींची संख्या ७ लाख ८० हजार ९७१ होती. त्यातही नववीतून शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण १६.५६ टक्के आहे. त्याचप्रमाणे नवीन आणि दहावीदरम्यान शाळा सोडणाऱ्यांची संख्या १२.२० टक्के असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना नववीत नापास केले जात असल्याचे समोर आले आहे.
शाळांचा दर्जा हा साधारणत: दहावीच्या निकालावर ठरविला जातो. त्यामुळे शाळांकडून दहावीमध्ये विद्यार्थी घेताना कडक गाळणी लावली जाते. आठवीपर्यंत
परीक्षा फार गांभीर्याने घेण्याची सवय नसणाऱ्या
विद्यार्थ्यांना नववीमध्ये आल्यावर ताण सहन होत नाही. शैक्षणिक वर्ष २०१४-१५मध्ये राज्यातील तब्बल २ लाख ७५ हजारांहून अधिक विद्यार्थी नववीतून दहावीमध्ये जाऊ शकले नाहीत. शिक्षण हक्क कायद्यानुसार, इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास केले जात नाही. त्यातच शिक्षकांकडूनही अभ्यासात मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जात नाही. राज्याच्या शिक्षण विभागाने ही बाब गांभीर्याने घेतली होती. नववीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने एका समितीची स्थापनाही केली होती. मात्र, त्यावर पुढे ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.
नववीमध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आठवीपर्यंतच्या मूल्यमापनाच्या पद्धतीत आणि नववीच्या मूल्यमापनाच्या पद्धतीत खूप फ रक आहे. शासनाने ८वीपर्यंत सगळे विद्यार्थी पास केले जाणार, हे धोरण राबविल्यामुळे अनेक विद्यार्थी नववीमध्ये नापास होत आहेत, असा काही लोकांचा गैरसमज झालेला आहे. हा समज पूर्ण चुकीचा असून, आम्ही शाळेत विद्यार्थ्यांच्या आठवड्याला परीक्षा घेतो; पण अभ्यासक्रमात झालेल्या बदलामुळे विद्यार्थ्यांना नववी खूप किचकट वाटते.
- नागेश मोने, मुख्याध्यापक,
न्यू इंग्लिश स्कूल टिळक रस्ता.
>विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत नापास केले जात नाही. त्यामुळे बहुतेक विद्यार्थी नववीपर्यंत येऊन कच्चे राहतात. त्यांची तयारी करून घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना नापास केले जात नाहीत, तर ते नापास होत असतात. मात्र, त्यांना नववीमध्ये एटीकेटी देऊन पास करता येऊ शकते. त्यामुळे संबंधित विद्यार्थी कोणत्या विषयात कच्चा आहे, हे पालकांना समजेल. पालकांच्या ते लक्षात आणून विद्यार्थ्याची तयारी करून घेतली. पुनर्परीक्षेचा पर्यायही चांगला आहे. त्यातून विद्यार्थ्यांना आपल्या चुका सुधारण्याची संधी मिळू शकते.
- शहाजी ढेकणे, शिक्षणतज्ज्ञ
आठवीपर्यंत सगळे विद्यार्थी पास केले जाणार; त्यामुळे बरेचसे विद्यार्थी गांभीर्याने अभ्यास करीत नाहीत. त्यामुळे ते नववीमध्ये नापास होतात. आमच्या शाळेमध्ये आम्ही जे विद्यार्थी अभ्यास अप्रगत आहेत, त्यांचे ज्यादा तास घेतो. तो विषय पक्का करून घेतो.
- संगीता अत्रे, मुख्याध्यापक चंद्रकांत दरोडे विद्यालय, बीएमसीसी रस्ता
सीबीएससी पॅटर्न असल्यामुळे विद्यार्थ्यांना भूमिती हा विषय क्लिष्ट वाटत आहे. शिक्षकांनाही तो विषय समजवायला अवघड जात असल्यामुळे विद्यार्थ्यांना ९वीचा अभ्यास अवघड वाटत आहे. पालकांचेपण आपल्या मुलांकडे लक्ष नसते. त्यांना सांगितले, की तुमच्या मुलांचा हा विषय कच्चा आहे, तर तो विषयपण मुलांकडून करून घेत नाहीत.
- मानसी शास्त्री, मुख्याध्यापिका, मॉडर्न हायस्कूल, वारजे
आमच्या शाळेत नववीमध्ये १५ मुले नापास झाली. मुळात आठवीपर्यंत नापास करायचे नाही, हे शासनाचे धोरण चुकीचे आहे. त्यामुळे मुले अभ्यासात ढिली पडतात. शाळेतील बरीच मुले झोपडपट्टीमधून येतात. त्यांचे पालक अशिक्षित असतात. त्यांना मुलांचा अभ्यास घेता येत नाही. आठवीपेक्षा नववी अवघड आहे; त्यामुळे आठवीपर्यंत नापास न झालेली मुले नववीत येऊन अडकतात. शाळेतील बरीच मुले काम करणारी आहेत; त्यामुळे ती अभ्यासात मागे पडतात.
- गोकुळ कांबळे, मुख्याध्यापक, माडर्न हायस्कूल वारजे
शिवाजीनगरच्या भारत इंग्लिश स्कूलमध्ये या वेळी ३५ मुले नापास झाली. बऱ्याच मुलांच्या कुटुंबाचा आर्थिक स्थर कमी आहे. पालकांचे मुलांकडे लक्ष नसते. घरात अभ्यास घेतला जात नाही. त्यामुळे त्यांचा पाया कच्चा राहतो.
- कैलास साळुंखे, मुख्याध्यापक
शाळांनी नववीमध्ये मुलांकडे लक्ष देणे गरजेचे असते. गोळवलकर हायस्कूलचा नववीचा निकालही १०० टक्के आहे. विद्यार्थ्यांना कन्सेप्ट पूर्णपणे समजल्याशिवाय पुढे जात नाही. वेळोवेळी प्रॅक्टिकल करून घेतली जातात. - माधुरी ठकार, शिक्षिका
>शिक्षकांचे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष नको
शिक्षण हक्क कायद्यामुळे शिक्षकांच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. मात्र, पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थी नापास न करण्याच्या निर्णयामुळे शिक्षकांचे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. अभ्यासात मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जात नसल्यामुळे नववीमध्ये कच्चे विद्यार्थी जातात. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष न करता सुटीच्या कालावधीत अशा विद्यार्थ्यांची अधिक तयारी करून घेणे गरजेचे आहे, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.