ब्रेकफेल पीएमपीमुळे प्रवाशांचा थरकाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2016 04:46 IST2016-09-10T04:46:22+5:302016-09-10T04:46:22+5:30
वेळ दुपारी बाराची...डीएसके विश्वमधील स्थानकात लावलेल्या शिवाजीनगरकडे जाणाऱ्या बसमध्ये दहा ते पंधरा प्रवासी बसले होते.

ब्रेकफेल पीएमपीमुळे प्रवाशांचा थरकाप
पुणे : वेळ दुपारी बाराची...डीएसके विश्वमधील स्थानकात लावलेल्या शिवाजीनगरकडे जाणाऱ्या बसमध्ये दहा ते पंधरा प्रवासी बसले होते.. काही वेळातच गाडी निघणार असल्याने वाहकही तिकिटे फाडण्यात मग्न. अचानक गाडीचा हँन्डब्रेक निकामी झाल्याने गाडी चालकाविनाच उतारावर धावू लागली.. त्यामुळे गाडीतील प्रवासी आणि स्थानिक रहिवाशांचा एकच गोंधळ उडाला. मात्र, काही अंतरावर एका लोखंडी खांबाला धडकून बस थांबली आणि मोठा अनर्थ टळला.
बसला निघण्यास वेळ असल्याने चालक संतोष बत्तीसे गाडीचा हँन्डब्रेक लावून खाली उतरले होते. बसमध्ये तीन-चार पुरुष आणि दहा-बारा महिला प्रवासी होते. वाहक गिरीश डोंगरे प्रवाशांना तिकीट देण्यात मग्न होते. अशातच अचानक बस उतारारून धावू लागली. त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. तो ऐकून चालक बत्तीसे यांनी प्रसंगावधान दाखवत चालत्या बसमध्ये चढून स्टिअरिंग आणि ब्रेकचा ताबा घेतला. त्यावेळी दोन्ही ब्रेक फेल झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पुढे उतारावर मोठा खड्डा असल्याची त्यांना माहिती होती. त्यामुळे त्यांनीगाडी त्या ठिकाणी असलेल्या एका लोखंडी खांबाला धडकविली. (प्रतिनिधी)
>जीवावर आले ते जखमेवर निभावले
काही अंतर आधीच ही गाडी थांबली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. गाडीतील महिलांचा आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गाडीच्या पुढील भागाचे नुकसान झाले असून चालक बत्तीसे यांच्या पायाला तसेच काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.