ब्रेकफेल पीएमपीमुळे प्रवाशांचा थरकाप
By Admin | Updated: September 10, 2016 00:51 IST2016-09-10T00:50:46+5:302016-09-10T00:51:10+5:30
वेळ दुपारी बाराची... शिवाजीनगरकडे जाण्यासाठी डीएसके विश्वमधील दहा ते पंधरा प्रवासी स्थानकावर लावलेल्या पीएमपी बसमध्ये बसले होते..

ब्रेकफेल पीएमपीमुळे प्रवाशांचा थरकाप
पुणे : वेळ दुपारी बाराची... शिवाजीनगरकडे जाण्यासाठी डीएसके विश्वमधील दहा ते पंधरा प्रवासी स्थानकावर लावलेल्या पीएमपी बसमध्ये बसले होते.. काही वेळातच गाडी निघणार असल्याने वाहकही तिकिटे फाडण्यात मग्न. अचानक गाडीचा हँडब्रेक निकामी झाल्याने गाडी चालकाविनाच उतारावर धावू लागली.. त्यामुळे गाडीतील प्रवासी आणि स्थानिक रहिवाशांचा एकच गोंधळ उडाला. मात्र, सुदैवाने काही अंतरावर जाऊन एका लोखंडी खांबाला धडकून ही गाडी थांबली आणि मोठा अनर्थ टळला.
डीएसके विश्वमधून शिवाजीनगरकडे जाणारी बस (एमएच १२ एचबी ७०७) प्रवासी घेण्यासाठी थांबली होती. बस निघण्यासाठी काही वेळ असल्याने बसचे चालक संतोष बत्तिसे हे गाडीचा हँडब्रेक लावून खाली उतरले होते. त्या वेळी वाहक गिरीश डोंगरे गाडीतच तिकिटे देत होते. बसमध्ये तीन-चार पुरुष आणि दहा-बारा महिला प्रवासी होत्या. अचानक गाडीचे हँडब्रेक फेल झाल्याने ही गाडी उतारारून धावू लागली.
त्यामुळे चालक नसताना बस पुढे जाऊ लागल्याने घाबरलेल्या प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. हा आरडाओरडा ऐकून चालक बत्तिसे हे प्रसंगावधान दाखवून पळत जाऊन गाडीत घुसले. त्यानंतर त्यांनी स्टिअरिंग आणि ब्रेकचा ताबा घेतला. त्या वेळी दोन्ही ब्रेक फेल झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याच वेळी पुढे उतारावर एक मोठा खड्डा असल्याचे त्यांना आधीच माहिती होते. त्यामुळे त्यांनी प्रसंगावधान दाखवून गाडी त्या ठिकाणी असलेल्या एका होर्डिंगच्या लोखंडी खांबाला धडकविली. त्यामुळे खड्ड्यापासून काही अंतर आधीच ही गाडी थांबली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.(प्रतिनिधी)
प्रवाशांच्या मागणीकडे दुर्लक्ष
डीएसके विश्वमधील स्थानक हे उतारावर आहे. याशिवाय या मार्गाचा रस्ता चढावर आहे. त्यामुळे या मार्गावर ब्रेकडाऊनचे प्रमाण अधिक आहे. ही बाब लक्षात घेऊन या ठिकाणच्या प्रवाशांकडून अनेकदा चांगल्या आणि सुस्थितीमधील गाड्या देण्याची मागणी करण्यात आली आहे. पण, पीएमपीकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे या दुर्घटनेनंतर तरी पीएमपी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रत्यक्षदर्शींनी केली आहे.
>चालकाच्या पायाला दुखापत
गाडीतील महिलांचा आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गाडीच्या पुढील भागाचे नुकसान झाले असून, चालक बत्तिसे यांच्या पायाला तसेच काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.