धाडसी युवकांनी वाचविला विद्यार्थ्याचा जीव
By Admin | Updated: May 28, 2015 00:59 IST2015-05-28T00:46:01+5:302015-05-28T00:59:52+5:30
कापशी येथील घटना : विहिरीत पाणी भरताना पाय घसरला

धाडसी युवकांनी वाचविला विद्यार्थ्याचा जीव
सूर्यकांत निंबाळकर - फलटण कापशी ता.फलटण येथे विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेला अकरावीतील मुलगा विहिरीत बुडाला. मात्र दोन मुलांनी जीव धोक्यात घालून त्या मुलाला सुखरुप बाहेर काढले. ग्रामस्थांनी त्या दोन्ही मुलांचा सत्कार करून समाजापुढे आदर्श निर्माण केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, अकरावीत शिकणारा अजय लांडगे (वय १७ सध्या रा. चिंचवड पुणे, मूळ रा. बारामती) हा आपल्या बहिणीकडे सुटीसाठी आला आहे. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास अजय हा सात वर्षाच्या मुलीसह विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेला होता. मात्र त्याचा तोल गेल्याने तो विहिरीत पडला. आणि पहाता-पहाता तो बुडाला. विहिरीच्या शेजारी उभ्या असणाऱ्या रोहिणी मसुगडे छोट्या मुलीच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरड करण्यास सुरूवात केली. त्या मुलीचा आवाज ऐकून मनोज जाधव (वय ३५ रा. कापशी ता. फलटण) हा धावत आला. मात्र अजय तोपर्यंत विहिरीत बुडाला होता. पाणी शांत होऊन पाण्यावर बुडबुडे येत होते. अखेर मनोजने क्षणाचाही विलंब न करता विहिरीत उडी टाकली. काही वेळानंतर मनोजने अजयला विहिरीच्या तळातून बाहेर काढले. परंतु मनोजची दमछाक झाल्याचे प्रशांत भिलारे (वय ३६ रा. कापशी) या युवकाच्या लक्षात आल्यानंतर त्यानेही विहिरीत उडी टाकून अजयला विहिरीबाहेर काढण्यास मदत केली. विहिरीबाहेर अजयला काढल्यानंतर तो बेशुद्ध पडला होता. त्यानंतर तत्काळ अजयला रुग्णालयात हलविण्यात आले. काही तासानंतर अजयची तब्बेत अगदी ठणठणीत झाली.
ग्रामस्थांकडून दोघांचाही गौरव
मनोज जाधव व प्रशांत भिलारे या युवकांनी आपला जीव धोक्यात घालून विद्यार्थ्याचा जीव वाचविला. त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच ग्रामसभा बोलावून गावाने या धाडसी युवकांच्या कामगिरीचा गौरव केला. यावेळी सरपंच सत्यवान बोबडे, उपसरपंच लता काकडे, दीपक कदम, अमोल शिंदे, तलाठी आढाव, ग्रामसेवक व्ही. आर. गफार, जनार्दन गार्डे, राहुल पवार तसेच कापशीचे ग्रामस्थ उपस्थित होते.