शेतीमालाला ‘ब्रॅण्डिंग’ चे बळ!
By Admin | Updated: May 22, 2014 02:16 IST2014-05-22T02:16:53+5:302014-05-22T02:16:53+5:30
विदर्भातील शेतकर्याचा माल देशातच नव्हे तर विदेशात पोहोचावा. त्याला योग्य भाव मिळावा.

शेतीमालाला ‘ब्रॅण्डिंग’ चे बळ!
विदर्भातील शेतकर्याचा माल देशातच नव्हे तर विदेशात पोहोचावा. त्याला योग्य भाव मिळावा. अन् येथील शेतकरी समृद्ध व्हावा. यासाठी कृषी व पणन मंडळाने येथील शेतकर्यांच्या मालाचे ब्रॅण्डिंग करून त्याची स्वत: विक्री करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यात सर्वप्रथम तांदूळ पिकाची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, विदर्भातील हा पहिलाच प्रयोग मानल्या जात आहे. शेतकरी हा दिवस-रात्र काबाडकष्ट करतो. धान्य पिकवतो. पण त्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. ही वस्तुस्थिती राहिली आहे. व्यापारी कमी किमतीत माल खरेदी करून त्यावर लाखो रुपयांचा नफा मिळवितो. परंतु त्याचा शेतकर्यांना काहीही फायदा होत नाही. विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात भाताचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन होते. शिवाय येथे पिकणारा तांदूळ हा चविष्ट व दज्रेदार असतो. मात्र असे असताना शेतकर्याच्या या तांदळाला कधीच योग्य भाव मिळत नाही. कृषी व पणन मंडळाने ही गोष्ट लक्षात घेऊ न, यंदा स्वत: शेतकर्यांचा धान २५00 ते २६00 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करून तो राज्यभरात पोहोचविला आहे. यात पणन मंडळाने सुमारे ११00 ते १२00 क्विंटल धानाची खरेदी करून त्याची ‘महाराईस’ या ब्रॅण्डच्या नावाने विक्री केली आहे. पणन मंडळाच्या या प्रयोगाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, त्यातून मंडळाचे मनोबल वाढले आहे. कदाचित यामुळेच मंडळाने आता तूर डाळ, भिवापुरी मिरची व हळदीचे ब्रॅण्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, पणन मंडळाने शेतकर्यांचा तांदूळ ५, १0 व २५ किलोच्या आकर्षक पॅकिंगमध्ये ‘महाराईस’ नावाने बाजारात उपलब्ध केला आहे. यातून गत वर्षभरात पुणे, मुंबई, ठाणे व औरंगाबाद शहरात या तांदळाची मोठय़ा प्रमाणात विक्री केली आहे. शेतकर्यांना मिळणार बोनस विशेष म्हणजे, कृषी व पणन मंडळाला ‘महाराईस’च्या विक्रीतून मिळणारा नफा शेतकर्यांना बोनस स्वरूपात परत केला जाणार आहे. पणन मंडळ शेतकर्यांकडून २५00 ते २६00 रुपये प्रति क्विंटल दराने धान खरेदी करून, त्याची ‘महाराईस’नावाने ५५ ते ६0 रुपये प्रति किलो दराने विक्री करीत आहे. यातून मंडळाला मोठय़ा प्रमाणात नफा मिळत आहे. पुढील वर्षभरात हा नफा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. यातून मंडळाकडे एक मोठी रक्कम गोळा होताच, ती संबंधित शेतकर्यांना बोनस स्वरूपात परत केली जाणार आहे. विशेष म्हणजे, असा प्रयोग यापूर्वी केवळ कापूस पणन महासंघाने केला आहे. मात्र धान उत्पादक शेतकर्यांना प्रथमच असा दुहेरी लाभ मिळणार आहे.