पावसामुळे धावत्या मुंबईला ब्रेक ( फोटो स्टोरी)
By Admin | Updated: August 5, 2016 16:06 IST2016-08-05T11:05:43+5:302016-08-05T16:06:42+5:30
शुक्रवार सकाळपासूनच मुंबईला मुसळधार पावसाने झोडपले असून वाहतूक कोंडी झाली आहे.

पावसामुळे धावत्या मुंबईला ब्रेक ( फोटो स्टोरी)
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे वाहतूकीवर परिणाम झाला आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतूक मंदावली असून सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पावसाच्या जोरदार सरींमुळे वाहतुकीलाही फटका बसला असून अनेक मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.
तसेच मुंबईकरांची लाइफलाइन असलेली लोकल सेवाही विस्कळीत झाली असून मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झाला. तिन्ही मार्गावरील लोकल १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत. दरम्यान मुसळधार पावसाचा हवाई सेवेलाही फटका बसला असून दृश्यमानता कमी असल्याने विमानांचे उड्डाण अर्धा तास उशिराने होत आहे.
परळ, दादर, वरळी, बोरीवली, कांदिवलीसह ठाणे आणि नवी मुंबई परिसरात मुसळधार पाऊस होत आहे. पालघर, वसई, विरार, ठाणे कल्याण, नवी मुंबई भागाच सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे त्यामुळे रस्ते वाहतुकीचाही खोळंबा झाला आहे.
पावसामुळे ईस्टर्न एक्सप्रेस वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. जेव्हीएलआर, मुलूंड टोल नाका ते कांजूरमार्गावरही वाहतूक कोंडी झाल्यामुळे तेथील वाहतूकही धिम्या गतीने सुरु आहे.
सखल भागात पाणी साचल्याने सायनपासून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
सायन-दादर दरम्यान ट्रॅकवर चार ते पाच इंच पाणी जमा झाल्याने मध्य रेल्वेची गती आणखी मंदावली आहे.
मुंबई आणि ठाणे परिसरात पुढच्या ४८ तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
( सर्व फोटो - सुशिल कदम आणि अतुल कासारे यांनी काढले आहेत. )