बारावीच्या पेपर तपासणीवरील बहिष्कार कायम
By Admin | Updated: March 1, 2017 05:57 IST2017-03-01T05:57:34+5:302017-03-01T05:57:34+5:30
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघासोबतची शिक्षणमंत्र्यांची बैठक मंगळवारी निष्फळ ठरली आहे.

बारावीच्या पेपर तपासणीवरील बहिष्कार कायम
मुंबई : दीर्घकाळ प्रलंबित आश्वासित व मान्य मागण्यांवर अंमलबजावणी करण्याची मागणी करत बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकणाऱ्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघासोबतची शिक्षणमंत्र्यांची बैठक मंगळवारी निष्फळ ठरली आहे. सरकार महासंघाच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे तावडे यांनी सांगितले. मात्र आश्वासन नको, तर अंमलबजावणी करण्याची मागणी करत महासंघाने पेपर तपासणीवरील बहिष्कार कायम ठेवण्याचा इशारा दिला आहे.
महासंघाने वेळोवेळी केलेल्या आंदोलनांनंतर सरकारने अनेक मागण्या मान्य केलेल्या आहेत. मात्र त्यावर अंमलबजावणी होत नसल्याने महासंघाला पेपर तपासणीवर बहिष्कार टाकावा लागत असल्याचे महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांनी सांगितले.
अधिकारी शिक्षणमंत्र्यांचे ऐकत नसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महासंघाने केली आहे. शिक्षकांवरील अन्याय त्वरित दूर करून मान्य केलेल्या मागण्यांची तत्काळ अंमलबजावणी सुरू करावी, असे आवाहनही महासंघाने केले आहे. अन्यथा शिक्षकांकडून होणाऱ्या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाचीच असेल, असेही संघटनेने शासनास कळविले आहे.
(प्रतिनिधी)