कॉम्प्यूटर बंद केल्याने मुलाने आईवर केला चाकूहल्ला
By Admin | Updated: September 10, 2014 12:44 IST2014-09-10T12:40:40+5:302014-09-10T12:44:31+5:30
कॉम्प्यूटर आणि स्मार्टफोनच्या आहारी गेलेल्या १५ वर्षाच्या मुलाने आईने कॉम्प्यूटर बंद केल्याने तिच्यावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.

कॉम्प्यूटर बंद केल्याने मुलाने आईवर केला चाकूहल्ला
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - कॉम्प्यूटर आणि स्मार्टफोनच्या आहारी गेलेल्या १५ वर्षाच्या मुलाने आईने कॉम्प्यूटर बंद केल्याने तिच्यावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नसून या मुलावर सध्या मनोविकातज्ज्ञ उपचार करत आहेत.
पुण्यात राहणा-या १५ वर्षीय मुलाला त्याच्या आईवडिलांनी तीन वर्षांपूर्वी मोबाईल घेऊन दिला होता. सुरुवातीला फक्त अर्धा तास सर्फिंग आणि गेम खेळणारा हा मुलगा काही महिन्यांनी दिवसातील निम्मावेळ मोबाईल व कॉम्प्यूटरवरच खर्ची करु लागला. या नादात त्याने शाळेलाही दांडी मारली. मुलाच्या आईवडिलांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्याने प्रतिसाद दिला नाही. याऊलट मला एकटे सोडून द्या, मला डिस्टर्ब करु नका असे तो सांगायचा. अखेरीस त्याच्या आईवडिलांनी मुलगा ऐवढा वेळ खोलीत बसून काय करतो हे बघण्यासाठी त्यावर पाळत ठेवली. यात तो कॉम्प्यूटर व मोबाईलद्वारे दिवसभर इंटरनेटवर चॅटिंग आणि सर्फिंग करत असल्याचे समोर आले. धक्कादायक बाब म्हणजे मोबाईलमध्ये इंटरनेट रिचार्ज करण्यासाठी त्याने आईवडिलांच्या बॅगेतून पैसे चोरल्याचे आढळले.
काही दिवसांपूर्वी मुलाची आई ज्या स्वतः पुण्यातील शाळेत शिक्षिका आहेत त्यांनी मुलाकडून मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला व त्याचा कॉम्प्यूटरही बंद केला. यामुळे संतापलेल्या मुलाने घरातील चाकूने आईवरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी आरडाओरड सुरु केल्याने मुलाच्या वडिलांनी खोलीत धाव घेत त्याच्याकडून चाकू खेचून घेतला व पुढील अनर्थ टळला. या घटनेनंतर आईवडिलांनी त्यांच्या मुलाला मुंबईतील भायखळा येथील रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात त्याच्यावर मनोविकारतज्ज्ञांनी उपचार केले असून यात त्याला एकदा शॉक ट्रीटमेंटही द्यावी लागली आहे. कॉम्प्यूटर व मोबाईल फोनच्या आहारी गेलेल्या या मुलाचे मानसिक संतूलन ढासळल्याने ही घटना घडली अशी माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली.