बोअरवेलमध्ये पडला बालक!
By Admin | Updated: February 1, 2015 02:02 IST2015-02-01T02:02:05+5:302015-02-01T02:02:05+5:30
शेतातील १५० फूट खोल बोअरवेलमध्ये अडीच वर्षीय बालक पडल्याची घटना उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथे शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली.

बोअरवेलमध्ये पडला बालक!
फुलसावंगी (जि़ यवतमाळ) : शेतातील १५० फूट खोल बोअरवेलमध्ये अडीच वर्षीय बालक पडल्याची घटना उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथे शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली. ४० फूट खोलवर तो चिखलात रूतून बसला असून, त्याला बाहेर काढण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रशासनाचे प्रयत्न सुरूच होते़ शंकर सुरज आखरे असे बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
निंगनूर येथील नईम अली रजाक अली यांच्या शेतात एक बोअरवेल खोदण्यात आली. मात्र, त्याला पाणी न लागल्याने केसिंग टाकले नाही. त्यावर पोते व तुराट्या टाकून झाकून ठेवली आहे. शनिवारी काही मजूर शेतात निंदणाचे काम करीत होते. त्यावेळी सुरज आखरे, त्याची बहीण पूजा आपल्या आईसोबत या शेतात गेले होते. शेतात खेळताना अचानक सुरज बोअरवेलसाठी खोदलेल्या खड्ड्याकडे गेला आणि तो त्यात कोसळला. त्याने जोराने आवाज दिल्याने सर्व मजूर व शेतमालक नईम अली धावून आले. माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदत सुरू केले. तालुका वैद्यकीय अधिकारी जब्बार पठाण यांच्या पथकाने बोअरवेलमध्ये आॅक्सिजन पुरवठा सुरू केला तर त्याला पाणी व बिस्कीट दोराच्या साहाय्याने बांधून आतमध्ये सोडण्यात आले. सुरज आतून आई-आई असा सारखा आवाज देत आहे. दरम्यान, दोन जेसीबीच्या मदतीने बोअरवेलच्या जवळ १० फूट अंतरावर खड्डा खोदून सुरजला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. उमरखेड येथून अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. उमरखेड आणि महागावचे पोलीसही घटनास्थळावर पोहोचले. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरूच होते.