बोर्इंग एमआरओला मिळणार नवी ऊर्जा
By Admin | Updated: November 19, 2014 00:49 IST2014-11-19T00:49:46+5:302014-11-19T00:49:46+5:30
विमानाच्या देखभाल-दुरुस्तीच्या दृष्टीने नागपूर महत्त्वाचे ठिकाण आहे. बोर्इंगचा एमआरओ सुरू झाला तर विमानांच्या दुरुस्ती कामांना वेग येईल आणि मोठ्या प्रमाणात विदेशी चलनाची बचत होईल,

बोर्इंग एमआरओला मिळणार नवी ऊर्जा
केंद्रीय मंत्र्यांनी केली प्रकल्पाची पाहणी : कामाला गती देण्याचे निर्देश
नागपूर : विमानाच्या देखभाल-दुरुस्तीच्या दृष्टीने नागपूर महत्त्वाचे ठिकाण आहे. बोर्इंगचा एमआरओ सुरू झाला तर विमानांच्या दुरुस्ती कामांना वेग येईल आणि मोठ्या प्रमाणात विदेशी चलनाची बचत होईल, असा विश्वास केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
बोर्इंगच्या कामातील अडथळे दूर करून काम गतीने सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना मंत्र्यांनी दिले. एमआरओ व टॅक्सी-वेच्या कामाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री आणि एअर इंडियाची टीम मंगळवारी नागपुरात आली होती. राजू यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बंदद्वार चर्चा केली आणि एमआरओची पाहणी केली.
मंत्र्यांनी सांगितले की, बोर्इंगचे काम २००४ मध्ये सुरू झाले. २००६ ते २०१४ या आठ वर्षांच्या कालावधीत कामात अपेक्षित प्रगती होऊ शकली नाही. कोणत्या कामासाठी किती वेळ लागेल, शिवाय प्रलंबित कामाचा आढावा नवी दिल्लीत घेण्यात येणार आहे. ही कामे लवकरच पूर्ण होऊन एमआरओ कार्यान्वित होईल. बोर्इंग आणि एमएआयडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना उद्भवणाऱ्या अडचणींवर बैठकीत चर्चा केली.
एमआरओला ९ मेगावॅट विजेची गरज
एमआरओला प्रारंभी ३ मेगावॅट वीज लागणार आहे. प्रकल्प सुरू झाल्यानंतर ५ मेगावॅट, पुढे ७ मेगावॅट आणि नंतर ९ मेगावॅट विजेची गरज भासणार आहे. एमएडीसी विजेचा पुरवठा करणार आहे. सवलतीच्या दरात वीजपुरवठा करण्यावर बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.
१५ डिसेंबरपर्यंत टॅक्सी-वे
१५ जानेवारीपर्यंत एमआरओ
टॅक्सी-वे आणि एमआरओ लवकरच पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) अधिकाऱ्यांनी टॅक्सी-वेचे काम १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन बैठकीत दिले. त्यांनी सांगितले की, टॅक्सी-वेचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर बोर्इंगच्या अधिकाऱ्यांनी १५ जानेवारीपर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांना दिले. काम पूर्ण झाल्याचा तपासणी अहवाल एअर इंडियाकडे सोपविणार आहे. त्यानंतर डीजीसीएची तांत्रिक चमू या प्रकल्पाची पाहणी करून अहवाल सादर करतील. टॅक्सी-वेच्या चाचणीनंतर एमआरओचे उद्घाटन होईल. त्यामुळे डिसेंबरमध्ये नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान बोर्इंग एमआरओच्या उद्घाटनाची आशा मावळली आहे.
प्रकल्पग्रस्तांशी चर्चा
केंद्रीय मंत्री अशोक गजपती राजू यांनी टॅक्सी-वे, एमआरओ आणि विकास कामांची पाहणी केल्यानंतर जमिनीचे अधिग्रहण आणि पुनर्वसन संदर्भातील मिहान प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी ऐकून घेतल्या. त्यावर तोडगा काढून त्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन प्रकल्पग्रस्तांना दिले.
प्रकल्पग्रस्तांच्या अडचणींवर तातडीने निर्णय घ्या, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. केंद्रीय मंत्री अशोक गजपती राजू यांच्यासोबत एमएडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे, एअर इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक रोहित नंदन, मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकट, विभागीय आयुक्त अनुप कुमार, एल अॅण्ड टी लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी, एमएआयडीसीचे तांत्रिक सल्लागार आर.पी. याहुल, मुख्य अभियंते एस.व्ही. चहांदे, अधीक्षक अभियंता एस.के. चॅटर्जी, कार्यकारी अभियंता आर.पी. लोणारे, विपणन व्यवस्थापक ए.आर. ठाकरे, पीआरओ दीपक जोशी, एम.ए. आबीद रुही उपस्थित होते. (प्रतिनिधी)