सीमावादात आठ गावे अंधारात!
By Admin | Updated: February 4, 2015 00:52 IST2015-02-04T00:52:26+5:302015-02-04T00:52:26+5:30
दफ्तरदिरंगाईमुळे महाराष्ट्र शासनाने वीज पुरवठा केला नाही. तेलंगण (पूर्वी आंध्र प्रदेश) राज्याने सहानुभूती मिळावी, म्हणून विजेचे खांब उभे करून वीज दिली. दोन वर्षांपूर्वीपर्यंत दरमाह

सीमावादात आठ गावे अंधारात!
तेलंगणने दोन महिन्यांपूर्वी वीज कापली : महाराष्ट्राची वीज पोहोचलीच नाही
संघरक्षित तावाडे - जिवती, (चंद्रपूर)
दफ्तरदिरंगाईमुळे महाराष्ट्र शासनाने वीज पुरवठा केला नाही. तेलंगण (पूर्वी आंध्र प्रदेश) राज्याने सहानुभूती मिळावी, म्हणून विजेचे खांब उभे करून वीज दिली. दोन वर्षांपूर्वीपर्यंत दरमाह प्रति कुटुंब ५० रुपये वीज देयकाच्या रुपात घेऊन विजेचा पुरवठा केला आणि आता मात्र दोन महिन्यांपासून तो खंडितदेखील केला.
महाराष्ट्र आणि तेलंगण राज्याच्या (पूर्वी आंध्र प्रदेश) सीमेच्या वादात अडकलेल्या १४ पैकी सात ते आठ गावांतील नागरिकांची ही व्यथा आहे. देयकाची रक्कम न भरल्याचे कारण पुढे करीत त्यांना अंधारात ढकलले जात आहे तर अद्याप देयकच न पोहोचल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. एकंदरीत महाराष्ट्र तेलंगण राज्याच्या सीमावादात या गावकरी भरडले जात असून महाराष्ट्र शासनाचा गचाळ कारभार यासाठी कारणीभूत आहे.
जिवती तालुक्याच्या सीमेवरील १४ गावे वादग्रस्त असून या गावांत दोन्ही राज्याच्या काही प्रमाणात सुविधा आहेत. पैकी लेंडीगुडा, भोलापठार, अंतापूर, येसापूर, इंदिरानगर, पदमावती, कामतगुडा या गावांत सुरूवातीपासूनच आंध्र प्रदेश राज्याची वीज सुरू होती. आंध्रमधून तेलंगण वेगळे राज्य झाल्यानंतर या राज्याने वीज कापल्याने सध्या येथे मोठी अडचण निर्माण झाली आहे.
या सातही गावांजवळ राजीव गांधी ग्रामीण योजनेंतर्गत महाराष्ट्राचे खांब उभे करून केवळ ट्रान्सफार्मर बसविण्यात आले आहेत. जिवतीचे उपकार्यकारी अभियंता एन.एम. वैरागडे यांनी येथील नागरिक जोपर्यंत डिमांड भरत नाहीत, तोपर्यंत वीज कनेक्शन देता येणार नसल्याचे सांगितले.
तर, बल्लारपूर विभागाचे कार्यकारी अभियंता चोपडे यांच्याशी संपर्क साधला असता, या ठिकाणी आताच आलो आहे, यासंदर्भात मला काहीच माहीत नसल्याचे सांगून त्यांनी हात वर केले आहेत.महाराष्ट्राची वीज नसली तरी पूर्वी तेलंगणा राज्यातून वीज पुरवठा होत असल्याने गावकऱ्यांना अडचण नव्हती. मात्र तेलंगणानेही वीज कापल्याने पीठ गिरणी, शेतातील मोटारपंप बंद झाले आहेत. अतिसंवेदनशील व दुर्गम असलेल्या या गावातील नागरिक अंधारात वास्तव्य करीत आहेत. परीक्षेच्या तोंडावर वीज कापल्याने विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे.
ग्रामस्थ म्हणतात...
वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांकडून डिमांड अर्ज प्राप्त झाले नाही, असे नेहमी ऐकायला मिळते, पण हे सर्व चुकीचे आहे. आम्ही २५-३० ग्रामस्थ मिळून डिमांड अर्ज १८ महिन्यांपूर्वी भरले आहेत. पण आम्हाला डिमांड पावती अजूनही दिली नाही. दोन महिन्यांपासून आम्ही अंधारात असून कोणताही अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींने गावात येऊन समस्या जाणून घेण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही.
- उत्तम शंकर कराळे, ग्रामस्थ