बाऊन्सर हत्याप्रकरणातील सूत्रधार ‘जॉन’च
By Admin | Updated: April 8, 2017 03:21 IST2017-04-08T03:21:36+5:302017-04-08T03:21:36+5:30
बाऊन्सर विक्की शर्माच्या हत्याप्रकरणामागचा मुख्य सूत्रधार मुंबई गुन्हे शाखेने बेड्या ठोकलेला जॉन अॅग्नोलो असल्याचे तपासात समोर आले

बाऊन्सर हत्याप्रकरणातील सूत्रधार ‘जॉन’च
मुंबई : डोंबिवलीतील बांधकाम व्यावसायिक अमित पाटील समजून गोळीबारात मरण पावलेल्या बाऊन्सर विक्की शर्माच्या हत्याप्रकरणामागचा मुख्य सूत्रधार मुंबई गुन्हे शाखेने बेड्या ठोकलेला जॉन अॅग्नोलो असल्याचे तपासात समोर आले आहे. गँगस्टर विजय शेट्टीच्या सांगण्यावरून त्याने अमित पाटीलची सुपारी घेतली होती.
कल्याण-शीळ रोडवरील काटईनाका येथे गेल्या वर्षी २१ डिसेंबर रोजी शिवसेनेचा पदाधिकारी आणि व्यावसायिक अमित पाटील समजून विकी शर्मा या त्याच्या बाऊन्सरवर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात बिल्डरचा बाऊन्सर ठार झाला होता. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या हत्याकांडाच्या १३व्या दिवशी पोलिसांनी कुख्यात गँगस्टर अबू सालेमचा हस्तक राकेश उर्फ राजू हातणकर याच्या अटकेनंतर अंडरवर्ल्ड गँगस्टर छोटा शकीलचा सुपारीकिंग हस्तक मोहंमद टक्काच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर शार्प शूटर बच्चा यादवलाही बेड्या ठोकल्या.
शूटर्सच्या गोळीबारात पाटीलऐवजी शर्माची हत्या झाल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले आहे. त्यातून या हत्येमागचे मूळ गूढ उकलणार असल्याचे गुन्हे शाखेचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
>जॉनची पार्श्वभूमी
मूळचा खार येथील रहिवासी असलेल्या जॉनने १९८६मध्ये एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याच्या साथीदारासह एका इसमाची अॅसिड टाकून हत्या केली. त्याचा मोठा भाऊ काल्या अॅन्थोनी आणि ठाकूर एकत्र काम करत होते.
त्याच्याविरुद्ध मुंबईसह दिल्ली पोलिसांनी टाडा अंतर्गत कारवाई केली होती. व्यापाऱ्याकडून खंडणी उकळणे, तसेच नालासोपारा येथे २००३मध्ये झालेल्या हत्येप्रकरणातही तो आरोपी आहे. तसेच खेरवाडी, निर्मलनगर पोलीस ठाण्यातही त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत.