लोकल प्रवासादरम्यान फुटली अ‍ॅसिडची बाटली

By Admin | Updated: December 20, 2014 03:06 IST2014-12-20T03:06:52+5:302014-12-20T03:06:52+5:30

रेल्वे प्रवासात अ‍ॅसिडची बाटली फुटून सहा जण जखमी झाल्याची घटना मुलुंड-ठाणे मार्गावर शुक्रवारी दुपारी १.५२ च्या सुमारास घडली

Bottle Acid Bottle During Local Travel | लोकल प्रवासादरम्यान फुटली अ‍ॅसिडची बाटली

लोकल प्रवासादरम्यान फुटली अ‍ॅसिडची बाटली

डोंबिवली : रेल्वे प्रवासात अ‍ॅसिडची बाटली फुटून सहा जण जखमी झाल्याची घटना मुलुंड-ठाणे मार्गावर शुक्रवारी दुपारी १.५२ च्या सुमारास घडली. जखमींना ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. रेल्वे आणि लोकलमधून ज्वलनशीन पदार्थ नेण्यास बंदी असताना हा प्रकार घडला कसा, असा सवाल आता केला जात आहे.
अंबरनाथकडे जाणाऱ्या स्लो लोकलमध्ये डोंबिवलीचे नारायण शेट्टी घाटकोपर स्थानकातून चढले. मुलुंड येताच त्यांना अ‍ॅसिडची पिशवी फुटल्याचे ध्यान्यात आले़ पिशवीतून धूर बाहेर येऊ लागल्याने त्याने ती पिशवी तत्काळ बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये या सर्व प्रवाशांच्या अंगावर अ‍ॅसिडचे थेंब/शिंतोडे पडले. यात विजय वऱ्हाडकर (१९) गंभीर जखमी झाला. त्याच्या हाताला व छातीला भाजले. दिनेश सिंग (४०) आणि सरस्वती सिंग (३५) तर सुनील, सयाजी पालसे हेही जखमी झाल्याचे ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस एस. एम. गोसावी यांनी सांगितले.
गुन्हा दाखल होणार
अ‍ॅसिड घेऊन जाणाऱ्या प्रवाशावर रेल्वेतून ज्वलनशील पदार्थ वाहून नेणे, हलगर्जीपणा करणे या कलमांखाली गुन्हा दाखल होणार आहे. ही प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचेही ठाणे लोहमार्ग पोलिसांनी स्पष्ट केले.
उपचाराचा खर्च कोण देणार?
हा रेल्वेचा अपघात नसल्याने उपचार खर्चाबाबत विचार झाला नाही. तरीही विभागीय स्तरावर तसेच मुख्यालयातील अधिकाऱ्यांशी या संदर्भात चर्चा सुरू असल्याचे मध्य रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य मंडल रेल्वे प्रबंधक डॉ. अलोक बडगूल यांनी जखमींची भेट घेतल्यानंतर सांगितले.

Web Title: Bottle Acid Bottle During Local Travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.