येरवड्यातील दोघे इंद्रायणीत बुडाले
By Admin | Updated: July 4, 2016 01:07 IST2016-07-04T01:07:24+5:302016-07-04T01:07:24+5:30
इंद्रायणी नदीपात्रात मासे पकडायला गेले असताना आज (दि. ३) सायंकाळी चारच्या सुमारास वाहून गेल्याची घटना घडली.

येरवड्यातील दोघे इंद्रायणीत बुडाले
येरवडा/लोणीकंद : येथील एअरपोर्ट रस्त्यावरील जयप्रकाशनगरमध्ये राहणारे दोन तरुण लोहगावजवळील वडगाव शिंदे गावाच्या हद्दीत शिंदेवस्तीजवळच्या इंद्रायणी नदीपात्रात मासे पकडायला गेले असताना आज (दि. ३) सायंकाळी चारच्या सुमारास वाहून गेल्याची घटना घडली.
या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, त्यांचा येरवडा अग्निशमनचे जवान रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात शोध घेत होते. अमीन लतीफ कुरेशी (वय २७) व नेत्या ऊर्फ दीपक राजेंद्र शिंदे (वय २५, दोघेही रा. जयप्रकाशनगर, येरवडा) हे दोघे जण त्यांच्या आणखी ३ मित्रांसह मासे पकडायला गेले होते. हे पाच जण मासे पकडत असताना अचानक नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने यातील एक जण बुडायला लागला. त्याला वाचविण्यासाठी अमीन व दीपक नदीपात्रात गेले; मात्र त्यांचा बुडणारा मित्र सुखरूप नदीच्या पाण्याबाहेर आला, तर अमीन व दीपक नदीच्या पात्रातील पाण्यात बुडाले. येरवडा अग्निशमनचे पथक पाचच्या सुमारास घटनास्थळी पोहोचल्यानंतर तरुणांचा नदीपात्रात शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत या तरुणांचा तपास सुरूच होता. (वार्ताहर)