इम्रान शेख, उस्मानाबाद- बारा वर्षांपूर्वी वडिलांचे अपघाती निधन झाले.. वडिलांच्या पश्चात आधार होता तो आईचा.. मात्र, दीड वर्षांपूर्वी अल्पशा आजाराने आईही सोडून गेली आणि आठवी आणि दहावीत शिकणाऱ्या दोन बहिणीचे छत्र हरवले. मात्र, त्यानंतरही त्यांनी हिम्मत हरली नाही. दहावीतील निकिता शिक्षणाचे धडे गिरविण्यासाठी तीन दिवस शाळेत तर घरखर्च चालविण्यासाठी तीन दिवस कामाला जाते. तिनेच आता धाकट्या बहिणीच्याही शिक्षणाची जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. तालुक्यातील गोवर्धनवाडी परिसरातील या हिंमतवान बहिणींच्या धैर्याची ही कहाणी आहे. आई-वडिलांच्या मायेला पोरके झाल्यानंतर निकिता अगरचंद मोटे ही ढोकी येथीलच तेरणानगर साखर कारखाना प्रशालेत दहावीच्या वर्गात शिकत आहे. आईच्या निधनानंतर निकीता आणि तिची बहिण पूजा यांचा नातेवाईकांनी सांभाळ केला. मात्र, दोघी शाळेत जावू लागल्या, समज येवू लागली तसे नातेवाईकांकडे तरी किती दिवस रहायचे, असा प्रश्न निकिताला पडत होता. आणि अखेर लहान बहिणीची जबाबदारी खांद्यावर घेत निकिताने स्वत:च्या घरी म्हणजेच गोवर्धनवाडीत जावून राहण्याचा निर्णय घेतला. घरखर्च भागविण्यासाठी आठवड्यातील तीन दिवस ती मजुरी करते आणि तीन दिवस शाळेत जाते. पाच किलोमीटरची पायपीट करीत शाळेतून आल्यानंतरही दोन-तीन घरी धुणी-भांडी करून ती बहिणीचीही काळजी घेते. म्हणूनच आठवीत असलेल्या बहिणीला तिने आजपर्यंत एकदाही कुठे कामाला पाठविलेले नाही. >रेशनकार्ड मिळेना : शासकीय योजनांचा अनेक धनाढ्य गैरफायदा घेताना दिसतात मात्र मोठ्या धीराने झुंज देत जगणाऱ्या या बहिणींना प्रयत्न करूनही रेशनकार्ड मिळालेले नाही. सरकारने इतर सुविधा राहू दे, निदान रेशनकार्ड तरी द्यावे, अशी मागणी त्या करीत आहेत.
निराधार ‘दोघी’ बनल्यात एकमेकींचा आधार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2016 04:12 IST