खडकवासला धरणात दोघांचा मृत्यू
By Admin | Updated: April 23, 2017 21:21 IST2017-04-23T21:21:16+5:302017-04-23T21:21:16+5:30
खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा रविवारी दुपारी बुडाल्याने मृत्यू झाला

खडकवासला धरणात दोघांचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 23 - खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा रविवारी दुपारी बुडाल्याने मृत्यू झाला. रविवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली़. शनिवारीही एक जण धरणाच्या पाण्यात बुडाला असून, त्याचा शोध लागला नाही. शिरोज ताजउद्दीन नदाफ (वय १९)आणि वाजिद हुसेनअली सय्यद (वय १८ दोघेही रा़ खान वस्ती, वारजे) अशी या मुलांची नावे आहेत.
खडकवासला धरणात हे दोघे आपल्या मित्रांबरोबर पोहायला गेले होते. पोहत असताना ते धरणाच्या पाण्यात बुडत असल्याचे नागरिकांनी पाहिले. त्यांना बाहेर काढण्यात आले. ते बेशुद्धावस्थेत असल्याने त्यांना नवले रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. तपासणीअंती ते मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
शिरोज नदाफ हा १२ वी पास झाल्यानंतर एका खासगी महाविद्यालयात मॅकेनिकलचे शिक्षण घेत होता. वाजिद सय्यद हा सध्या घरीच होता. दोघेही मनमिळावू स्वभावाचे असल्याचे त्यांच्या मित्रांनी सांगितले. धरणाच्या एनडीए रस्ता भागात शनिवारी दुपारी मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेला एकजण बेपत्ता आहे. जीव देण्यासाठी जातो, असे सांगून तो पळून गेला. अग्निशामक दलाला रविवारी दुपारी माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी शोध घेण्यात आला, तथापि तो आढळला नाही. त्याचे कपडे काठावर होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी त्याचा शोध घेतला. परंतु, अद्याप त्याचा शोध लागला नसल्याचे अग्निशामक दलाने सांगितले.