सीमा असुरक्षित; पंतप्रधान मात्र प्रचारात व्यस्त - राऊत
By Admin | Updated: October 9, 2014 04:33 IST2014-10-09T04:33:20+5:302014-10-09T04:33:20+5:30
काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैनिक घुसखोरी करून भारतीय सैन्यावर हल्ला करीत आहेत. सीमा असुरक्षित असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठोस पाऊले उचलणे गरजेचे

सीमा असुरक्षित; पंतप्रधान मात्र प्रचारात व्यस्त - राऊत
नाशिक : काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैनिक घुसखोरी करून भारतीय सैन्यावर हल्ला करीत आहेत. सीमा असुरक्षित असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठोस पाऊले उचलणे गरजेचे असताना ते मात्र महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत अडकले आहेत. त्यामुळे देशाचे नुकसान होत असल्याची टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.
नाशिक जिल्ह्यात खा. राऊत यांच्या सभा झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी शिवसेनेने पाठबळ दिले. मोदी हे सक्षम पंतप्रधान आहेत. परंतु देशाची सीमा असुरक्षित असताना ते महाराष्ट्रात निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यांच्या सक्षम नेतृत्वाची देशाला गरज असून, त्यांनी आज दिल्लीत असणे गरजेचे आहे. पाक सैन्य काश्मीरमध्ये घुसखोरी करून भारतीय सैनिकांना ठार करीत आहे. त्यामुळे मोदींनी महाराष्ट्रात वेळ घालवू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री होण्यासाठी शिवसेनेला गरज भासल्यास कोणत्या पक्षाला बरोबर घेणार?, या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले, शिवसेना स्वबळावर २८५ जागा लढवित आहे. युती असताना ‘मिशन १५0’ होते. आता आम्ही १८0 ते २00 जागा मिळवून बहुमत मिळविणार आहोत.
शिवसेना महाराष्ट्राचे कदापि विभाजन होऊ देणार नसल्याचे राऊत यांनी ठणकावून सांगितले.