सीमावासीयांना दिलासा मिळेल

By Admin | Updated: December 10, 2014 00:31 IST2014-12-10T00:22:50+5:302014-12-10T00:31:14+5:30

एन. डी. पाटील : बेळगावात एकीकरण समितीचा महामेळावा; मराठी भाषिक लढा सुरूच ठेवतील

The border people will get relief | सीमावासीयांना दिलासा मिळेल

सीमावासीयांना दिलासा मिळेल

बेळगाव : कर्नाटक सरकारने बेळगाव शहरात चालविलेली हुकूमशाही व पक्षपाती धोरण याविरोधात सीमाभागातील मराठी भाषिक बेळगावसह अखंड महाराष्ट्रचा लढा सुरूच ठेवतील. सीमाभागातील मराठी माणसांनी हताश होऊ नये, सर्वोच्च न्यायालयात आपल्याला दिलासा मिळेल, असा विश्वास ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी आज व्यक्त केला.
बेळगाव येथील टिळकवाडी भागातील वक्सिन डेपो मैदानात महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाविरोधात आयोजित केलेल्या महामेळाव्याचे उद्घाटन प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मध्यवर्ती एकीकरण समितीचे अध्यक्ष वसंतराव पाटील, अ‍ॅड. राम आपटे, दीपक दळवी, मालोजी अष्टेकर, मनोहर किणेकर, आमदार संभाजी पाटील, आमदार अरविंद पाटील, निंगोजी हुद्दार उपस्थित होते.
प्रा. पाटील म्हणाले, बेळगावातील मराठी माणसाचा स्वाभिमान डिवचण्यासाठी कर्नाटक सरकार बेळगावात विधीमंडळ अधिवेशन भरवत आहे. बेळगावचे नामांतर करीत आहे. याशिवाय मास्टर प्लॅन आखून गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावत आहे. गेल्या ६० वर्षांपासून लोकशाही मार्गाने चाललेला हा लढा असून, न्याय मिळेपर्यंत तो सुरूच राहील. सर्वोच्च न्यायालयातील प्रत्यक्ष सुनावणी काही दिवसांत सुरू होईल. यामध्ये सीमावासीयांना न्याय मिळेल.
जिल्हा प्रशासनाने जाचक अटी घालून या मेळाव्यास परवानगी दिली होती. तरीही सीमाभागातील हजारो मराठी भाषिक मेळाव्यास उपस्थित होते. ‘बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, आदी घोषणांनी टिळकवाडी परिसर दणाणून गेला होता. (प्रतिनिधी)

महाराष्ट्रातील नेत्यांनी फिरवली पाठ
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या महामेळाव्याकडे अपेक्षेप्रमाणे
महाराष्ट्रातील नेत्यांनी पाठ फिरवली. प्रा. एन. डी. पाटील, माजी
आमदार नरसिंगराव पाटील आणि भरमू सुबराव पाटील वगळता
महाराष्ट्रातील एकही मोठा नेता महामेळाव्यास आला नसल्याने सीमाभागाला पुन्हा एकदा महाराष्ट्रातील नेत्यांनी पोरका केल्याची भावना सीमावासीयांत निर्माण झाली आहे.


कर्नाटक सरकारच्या कारवाईच्या भीतीने बेळगावच्या महापालिकेत सीमाप्रश्नाचा ठराव न मांडणारे, तसेच काळ्या दिनाच्या सायकल फेरीत सहभागी न झालेले महापौर, उपमहापौर आणि नगरसेवक या मेळाव्यास उपस्थित होते. त्यांच्या हजेरीमुळे मराठी भाषिक सुखावले; मात्र त्यांनी मौन बाळगल्यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी जोरदार घोषणाबाजी करून त्यांचा निषेध व्यक्त केला. चंदगडचे माजी आमदार नरसिंगराव पाटील यांनी आपल्या भाषणात मराठी नगरसेवकांनी सीमाप्रश्नाचा ठराव मांडावा, अशी मागणी केली.

Web Title: The border people will get relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.