सीमा तपासणी नाक्याचे साडेपाच लाख लुटले

By Admin | Updated: August 20, 2014 01:04 IST2014-08-20T01:04:16+5:302014-08-20T01:04:16+5:30

आंध्र प्रदेश-महाराष्ट्र राज्य सीमेवरील तपासणी नाक्याचे ५ लाख ६५ हजार रुपये दुचाकीवरील दोघांनी भरदिवसा लुटून नेले. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर पाटणबोरीनजीक मंगळवारी घडली.

Border detection looted five and a half million pirates | सीमा तपासणी नाक्याचे साडेपाच लाख लुटले

सीमा तपासणी नाक्याचे साडेपाच लाख लुटले

राष्ट्रीय महामार्गावर भरदिवसा घडली घटना : युवकाला जबर मारहाण
पाटणबोरी (जि. यवतमाळ) : आंध्र प्रदेश-महाराष्ट्र राज्य सीमेवरील तपासणी नाक्याचे ५ लाख ६५ हजार रुपये दुचाकीवरील दोघांनी भरदिवसा लुटून नेले. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर पाटणबोरीनजीक मंगळवारी घडली.
प्रवीण राऊत (२२) रा. यवतमाळ असे यातील फिर्यादी युवकाचे नाव आहे. लुटारूंच्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. पांढरकवडा ते आदिलाबाद मार्गावर पिंपळखुटी येथे राज्य शासनाचा अत्याधुनिक चेक पोस्ट अर्थात सीमा तपासणी नाका आहे. सद्भावना कंपनीमार्फत हा नाका चालविला जातो. या कंपनीची ५ लाख ६५ हजार रुपयांची रक्कम घेऊन प्रवीण राऊत मंगळवारी सकाळी यवतमाळला जाण्यासाठी निघाला. चेक पोस्टवरून एका स्कुटीवर तो पाटणबोरी येथे आला. परंतु तेलंगणा राज्यात बंद पाळला जात असल्याने आंध्र प्रदेशातून पांढरकवड्याकडे येणारी एकही बस त्याला भेटली नाही. दरम्यान, एका हिरोहोंडा स्प्लेंडर चालकाने त्याला लिफ्ट दिली. परंतु काही दूर अंतर जाताच ढोकी गावानजीक एका बंद ढाब्यामागे नेऊन प्रवीणला लुटण्यात आले. त्याला दगडाने गंभीर जखमी करून त्याच्याकडील रक्कम घेऊन दोन्ही युवक दुचाकीने पांढरकवड्याकडे पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पांढरकवडा व पाटणबोरी पोलिसांनी तपास चक्रे फिरविली. परंतु पोलिसांना या घटनेबाबत संशय वाटत असल्याने त्यांनी फिर्यादीचीच उलटतपासणी चालविली. या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. उपरोक्त सीमा तपासणी नाक्यावर सेवा शुल्काच्या नावाखाली प्रत्येक वाहनाकडून ९० रुपये वसूल केले जातात. याशिवाय ओव्हरलोड वाहनांना दंडही आकारला जातो. या वसुलीतून चेक पोस्टवर दररोज दीड ते पावणेदोन लाख रुपये जमा होतात. ही रक्कम सद्भावना कंपनीचा कर्मचारी यवतमाळ येथे जाऊन आयसीआयसीआय बँकेत भरतो. दोन दिवसांची सुटी आल्याने ही रक्कम ५ लाख ६५ हजार एवढी जमा झाली. नेहमी प्रवीण व त्याचा एक साथीदार ही रक्कम घेऊन यवतमाळला जात होते.
प्रवीण एसटी बसने तर त्याचा साथीदार इंडिका कारने जात असल्याचे सांगण्यात आले. प्रवीणच्या बयानात विरोधाभास आढळल्याने पोलिसांना घटनेबाबत संशय आहे.
रक्कम लुटणारे दोनही युवक अंदाजे ३० वर्ष वयाचे असून त्यातील एकाच्या अंगात लाल टी-शर्ट, पायावर बॅन्डेज आहे. त्याचा वर्ण गोरा असून डोक्यावर टक्कल पडले आहे तर दुसरा युवक सावळा असल्याचे प्रवीणने पोलिसांना सांगितले. सदर बॅगमध्ये ५ लाख ६५ हजार रुपये किमतीच्या संपूर्ण १०० रुपयांच्या नोटा होत्या. या भारी बॅगमुळेच आणि जखमी झाल्यामुळे लुटारूंचा प्रतिकार आपल्याला करता आला नाही, असे प्रवीणने पोलिसांना सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Border detection looted five and a half million pirates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.