रोस्टरने इच्छुकांना बुस्टर
By Admin | Updated: August 17, 2014 00:53 IST2014-08-17T00:53:37+5:302014-08-17T00:53:37+5:30
पुढील महापौर ओबीसी सर्वसाधारण संवर्गातून होणार आहे. शनिवारी मुंबईत यासाठी रोस्टर काढण्यात आले. महिलांसाठी आरक्षण येईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, ओबीसी सर्वसाधारण आरक्षण निघाले.

रोस्टरने इच्छुकांना बुस्टर
महापौरपद ओबीसी सर्वसाधारणसाठी राखीव : दटके, कोहळे, ठाकरे, भोयर शर्यतीत
नागपूर : पुढील महापौर ओबीसी सर्वसाधारण संवर्गातून होणार आहे. शनिवारी मुंबईत यासाठी रोस्टर काढण्यात आले. महिलांसाठी आरक्षण येईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, ओबीसी सर्वसाधारण आरक्षण निघाले. या रोस्टरमुळे महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या पुरुष नेत्यांना अप्रत्यक्षपणे ‘बुस्टर’ मिळाले आहे. महापौरपदासाठी सत्तापक्ष नेते प्रवीण दटके आघाडीवर आहेत. त्यांच्या पाठोपाठ जलप्रदाय समितीचे अध्यक्ष सुधाकर कोहळे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अविनाश ठाकरे, नासुप्रचे विश्वस्त डॉ. छोटू भोयर हे देखील शर्यतीत आहेत.
विधानसभा निवडुकीपूर्वी ५ सप्टेंबरला महापौरपदाची निवडणूक होईल. दटके, कोहळे, ठाकरे, भोयर हे चौघेही विधानसभेसाठी इच्छुक आहेत. कुणा एकाला महापौरपदी संधी देणे म्हणजेच निवडणुकीपूर्वीच विधानसभेचा पत्ता कट होणे आहे. सत्तापक्ष प्रवीण दटके तसे महापालिकेत ‘सिनिअर’ आहेत. ही त्यांची तिसरी टर्म आहे. अनिल सोले महापौर झाल्यानंतर दटके यांच्याकडे सत्तापक्ष नेतेपद सोपविण्यात आले होते. आता ते मध्य नागपूरच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मध्यचे तिकीट हवे, महापौरपद नको, अशी भूमिका दटके यांनी पूर्वीपासूनच घेतली आहे. मध्यमध्ये विकास कुंभारे आमदार आहेत. हलबा समाजाचा उमेदवार कापून दटकेंना उमेदवारी देण्यासाठी पक्षाला मोठे यज्ञदिव्य पार पार पाडावे लागेल. याचा फटका पक्षाला बसू नये म्हणून मध्यम मार्ग काढत पक्षातर्फे दटके यांना महापौरपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी बाध्य केले जाऊ शकते.
सुधाकर कोहळे, अविनाश ठाकरे व डॉ. छोटू भोयर हे तिघेही दक्षिणच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. दक्षिणची जागा शिवसेनेकडून भाजपला सुटली की आपलेच जमते, असा तिघांचाही दावा आहे. मात्र, विधानसभेच्या तिकिटासाठी आता महापौरपदाची संधी सोडली अन् उद्या दक्षिणची जागा शिवसेनेच्याच कोट्यात गेली तर ‘तेल गेले अन् तूपही गेले’ असे म्हणण्याची वेळ येऊ शकते. कोहळे यांनी नासुप्रचे विश्वतपद भूषविले आहे. जलप्रदाय समितीचे ते अध्यक्ष आहेत. डॉ. छोटू भोयर यापूर्वी उपमहापौर होते. आता नासुप्रचे विश्वस्त आहेत. अविनाश ठाकरे यांनीही स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. दटकेंनी पद नाकारले तर मात्र या तिघांमध्ये जोरात रस्सीखेच होईल. तणातणी झाली तर पक्ष महिला नगरसेवकाला संधी देण्याचाही विचार करू शकतो. अशात उपनेत्या नीता ठाकरे यांचेही नाव समोर येऊ शकते. (प्रतिनिधी)