होम प्लॅटफॉर्मला बूस्ट
By Admin | Updated: January 15, 2015 00:54 IST2015-01-15T00:54:13+5:302015-01-15T00:54:13+5:30
नागपूर रेल्वेस्थानकावरील होम प्लॅटफॉर्मवर कुठल्याच सुविधा नसल्यामुळे पांढरा हत्ती ठरला होता. परंतु या प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून येथे प्लॅटफॉर्मचे छत,

होम प्लॅटफॉर्मला बूस्ट
कामाला मंजुरी : वॉशेबल अॅप्रॉन, प्लॅटफॉर्मवर छत टाकणार
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावरील होम प्लॅटफॉर्मवर कुठल्याच सुविधा नसल्यामुळे पांढरा हत्ती ठरला होता. परंतु या प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून येथे प्लॅटफॉर्मचे छत, वॉशेबल अॅप्रॉन आणि रेल्वेगाड्यात पाणी भरण्याची व्यवस्था करण्यात येत असल्यामुळे या प्लॅटफॉर्मचा चेहरामोहरा बदलणार आहे.
होम प्लॅटफॉर्मवर छत नसल्यामुळे पावसाळ्यात दुरांतो एक्स्प्रेसही दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरून सोडण्यात आली. अखेर या प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती ‘डीआरएम’ ओ.पी. सिंह यांनी अनौपचारिक चर्चेदरम्यान दिली. होम प्लॅटफॉर्मवर सध्या १०० मिटरचे छत आहे. दुसऱ्या टप्यात १०० मिटरचे दोन म्हणजे २०० मिटरचे छत टाकण्यात येणार असून त्यासाठी १.४० कोटी रुपये खर्च येणार आहे. होम प्लॅटफॉर्मवर वॉशेबल अॅप्रॉन नसल्यामुळे रेल्वे रुळावरील घाण साफ करणे गैरसोयीचे होते. येथे २४ कोचच्या वॉशेबल अॅप्रॉनचे काम होणार आहे. त्यासाठी १.३२ कोटी रुपये खर्च येणार असून या कामाची सुरुवात फेब्रुवारी महिन्यात होईल. होम प्लॅटफॉर्मवरून सुटणाऱ्या गाड्यात पाणी भरण्याची व्यवस्था करण्यात येणार असून त्यासाठी ४६ लाखाचा खर्च येणार आहे. होम प्लॅटफॉर्मचे काम सुरू झाल्यानंतर दुरांतो एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वरून सोडण्यात येईल.
अनौपचारिक चर्चेला वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. सुमंत देऊळकर, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक अतुल राणे, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही. के. आसुदानी, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त इब्राहिम शरीफ, जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)