पुस्तकांचे गाव उभारणार

By Admin | Updated: April 8, 2015 01:18 IST2015-04-08T01:18:27+5:302015-04-08T01:18:27+5:30

मराठी भाषा संवर्धनाचा अनोखा प्रयोग म्हणून पाच लाख पुस्तके असलेले पुस्तकांचे एक गाव महाबळेश्वर किंवा गणपतीपुळेनजीक लवकरच उभारण्यात येईल,

Book of books will be raised | पुस्तकांचे गाव उभारणार

पुस्तकांचे गाव उभारणार

मुंबई : मराठी भाषा संवर्धनाचा अनोखा प्रयोग म्हणून पाच लाख पुस्तके असलेले पुस्तकांचे एक गाव महाबळेश्वर किंवा गणपतीपुळेनजीक लवकरच उभारण्यात येईल, अशी घोषणा मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत केली.
मराठी भाषा संवर्धनाबाबत सत्तारुढ पक्ष सदस्यांनी उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना तावडे यांनी सांगितले की, ब्रिटनमध्ये असे ‘आॅन वे’ पुस्तकांचे गाव असून त्या धर्तीवर या गावाची उभारणी
केली जाईल. या उपक्रमाला
चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर
विदर्भ आणि मराठवाड्यातदेखील अशी गावे उभारली जातील. पुस्तकांच्या गावात ८० टक्के पुस्तके मराठीची तर २० टक्के इतर भाषांतील असतील. उन्हाळा, दिवाळी, नाताळच्या सुटीत अनेक विचारवंत, लेखकांना या गावात शासनाच्या खर्चाने आणून चर्चा घडवून आणली जाईल. बौद्धिक पर्यटनाचा हा अनोखा प्रयोग असेल, असे ते म्हणाले. महापालिका आणि नगरपालिकांच्या संकुलांमध्ये मराठी भाषा पुस्तकांच्या विक्रीसाठीचा गाळा कमी भाड्यावर उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.
मराठी भाषा संवर्धनाचे येत्या २५ वर्षांसाठीचे व्यापक धोरण लवकरच जाहीर केले जाईल. त्यासाठी शासनाने नेमलेल्या भाषा सल्लागार समितीच्या अहवालावर एक हजार लेखी सूचना आल्या असून त्यावर समिती आणि मराठी भाषा विभाग विचार करेल. मराठी भाषेसाठी कार्यरत सर्व मंडळ एकाच ठिकाणी आणले जातील,असे तावडे यांनी सांगितले. मराठी भाषा सर्व प्रकारच्या शाळांमध्ये सक्तीची करण्याचा विचार सुरू असल्याचे ते म्हणाले.
राज्यातील प्रत्येक आमदाराने आपल्या मतदारसंघातील एक शाळा दत्तक घ्यावी, असे आवाहन आपण केले असून त्याला निम्मे आमदारांनीच प्रतिसाद दिला आहे, असे त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Book of books will be raised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.