मुंबई-वडूज एसटीमध्ये बॉम्बची अफवा

By Admin | Updated: January 26, 2015 04:13 IST2015-01-26T04:13:48+5:302015-01-26T04:13:48+5:30

पनवेल येथे एसटी महामंडळाच्या बसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मुंबई ते वडूज जाणारी एसटी पनवेल बस स्थानकात थांबवली.

Bombing rumors in Mumbai-Vaduz ST | मुंबई-वडूज एसटीमध्ये बॉम्बची अफवा

मुंबई-वडूज एसटीमध्ये बॉम्बची अफवा

नवी मुंबई : पनवेल येथे एसटी महामंडळाच्या बसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मुंबई ते वडूज जाणारी एसटी पनवेल बस स्थानकात थांबवली. परंतु बॉम्ब स्क्वॉडच्या तपासणीत बसमध्ये काहीच आढळले नाही.
मुंबईकडून वडूजला जाणाऱ्या राज्य महामंडळाच्या एसटी (एमएच १४ बीटी ३११४)मध्ये बॉम्ब असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. मुंबई कंट्रोलवर अज्ञाताने बसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती दिली. मात्र तेव्हा बस प्रवासाच्या मार्गावर निघालेली असल्याने हा निरोप पनवेल पोलिसांकडे पोहोचवला. त्यानुसार उपआयुक्त संजय येनपुरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव भोसले यांनी पनवेल स्थानकात ही बस थांबवली. बसमधील प्रवाशांना सुरक्षेसाठी खाली उतरवून घटनास्थळी बॉम्बशोधक पथक, श्वानपथक यांनाही बोलावण्यात आले. त्यानुसार पनवेल स्थानकात दाखल झालेल्या या पथकांनी बसची झाडाझडती घेतली. परंतु बराच वेळ शोध घेऊनही त्यांना बसमध्ये संशयास्पद काहीच आढळले नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोसले यांनी सांगितले. तपासकामादरम्यान सुमारे दोन तासांचा अवधी गेल्याने बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसने नियोजित प्रवासावर पाठवले. तर एसटीमध्ये बॉम्ब असल्याची मिळालेली माहिती अफवा होती, असेही भोसले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Bombing rumors in Mumbai-Vaduz ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.