महाराष्ट्र भाजपच्या माजी प्रवक्त्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आल्यानंतर राज्याचे राजकारणात ठिणगी पडली आहे. याच पार्श्वभूमीवर आरती साठे यांच्या नियुक्तीवरून नाराजी व्यक्त केली आहे. सत्ताधाऱ्यांची बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणे चुकीचे आहे, असे मत आमदार रोहित पवारांनी मांडले आणि त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला. सध्याची राजकीय परिस्थिती बदलली असून स्वायत्त संस्थांचा वापर राजकीय हेतूसाठी केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
रोहित पवार म्हणाले की, "सध्या राजकीय परिस्थिती बदलल्याचे पाहायला मिळत आहे. २०१४च्या आधी सर्वजण निवडणूक आयोगाचा आदर करायचे आणि त्यांना स्वतंत्रपणे काम करणारी स्वायत्त संस्था मानत होते. परंतु, २०१४ पासून निवडणूक आयोग असो, ईडी असो किंवा सीबीआय, यांसारख्या स्वायत्त संस्थांचा राजकीय हेतूंसाठी वापर केला जात आहे." शिवाय, त्यांनी प्रवक्तेपदी असलेली व्यक्ती न्यायाधीश कशी? अशा न्यायाधीशामुळे न्याय कसा मिळणार? असे अनेक प्रश्न उपस्थित करत न्यायाधीश म्हणून आरती साठेंचे नाव वगळावे, अशी सरन्यायाधीशांकडे विनंती केली.
आरती साठे कोण आहेत?आरती साठे यांना वकील म्हणून २० वर्षांहून अधिकचा अनुभव असून, त्या प्रामुख्याने प्रत्यक्ष कर प्रकरणांच्या तज्ज्ञ आहेत. त्यांनी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सिक्युरिटीज अपीलीय न्यायाधिकरण, कस्टम्स, एक्साइज आणि सर्व्हिस टॅक्स अपीलीय न्यायाधिकरण तसेच मुंबई उच्च न्यायालयातील वैवाहिक वादांमध्ये प्रमुख वकील म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांचे वडील अरुण साठे हे देखील एक प्रसिद्ध वकील आहेत आणि त्यांचा आरएसएस व भाजपशी जवळचा संबंध आहे. याआधी आरती साठे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य म्हणूनही कार्यरत होत्या.