मुंबई हायकोर्टाने मांसविक्रीवरील बंदी उठवली
By Admin | Updated: September 14, 2015 19:14 IST2015-09-14T12:18:12+5:302015-09-14T19:14:37+5:30
मुंबई उच्च न्यायालयाने मांसविक्रीवरील बंदी उठवल्यामुळे आता १७ सप्टेंबर रोजी मांसविक्री सुरू राहणार आहे.

मुंबई हायकोर्टाने मांसविक्रीवरील बंदी उठवली
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - मांसविक्री बंदीवरून गेल्या काही दिवसांपासून उफाळून आलेला वाद आता शमण्याची चिन्हे आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने मांसविक्रीवरील बंदी अखेर उठवली असून आता १७ सप्टेंबर रोजी मांसविक्री सुरू राहणार आहे.
जैनधर्मीयांच्या पर्युषण काळात मांसविक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला आहे. राज्य सरकारने मांसविक्रीवर दोन दिवसांच्या बंदीचा निर्णय घेतला असताना मीरा-भार्इंदर, मुंबई व नवी मुंबई या महापालिकांनी चार ते आठ दिवस बंदीचा निर्णय घेतला. त्यावरून राज्यभरात वातावरण तापलेले असतानाच हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले आणि आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने बंदीचा हा निर्णय रद्द ठरवत मांसविक्री करण्यास परवानगी दिली. तसेच प्राण्यांच्या कत्तलखाने बंद ठेवण्याच्या निर्णयावर हस्तक्षेप करण्यास मात्र उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे १७ सप्टेंबर रोजी कत्तलखाने बंद राहतिल परंतु मांसविक्रीस आडकाठी नसेल असे स्पष्ट झाले आहे. मांसविक्री बंदीसंदर्भात २०१४ पासून सरकारने परिपत्रक काढले आहे. मात्र याची सक्तीने अंमलबजावणी झालीच नाही असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.