‘उडता पंजाब’वरून सेन्सॉरविरुद्ध बॉलिवूड
By Admin | Updated: June 9, 2016 06:31 IST2016-06-09T06:31:58+5:302016-06-09T06:31:58+5:30
दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या उडता पंजाब या चित्रपटातील ८९ दृश्यांना सेन्सॉर बोर्डाने कात्री लावल्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला

‘उडता पंजाब’वरून सेन्सॉरविरुद्ध बॉलिवूड
मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या उडता पंजाब या चित्रपटातील ८९ दृश्यांना सेन्सॉर बोर्डाने कात्री लावल्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, सेन्सॉर बोर्डाविरुद्ध संपूर्ण बॉलिवूड उभे राहिल्याचे चित्र आहे.
सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी कश्यप यांना आम आदमी पार्टीकडून पैसे मिळाले असून, पंजाब राज्याला बदनाम करण्यासाठीच हा चित्रपट बनविल्याचा आरोप केल्यामुळे त्याला राजकीय रंगही आला. आपने व कश्यप यांनी हे आरोप फेटाळले. निहलानी भाजपच्या हातातील खेळणे असल्याची टीका कश्यप यांनी केली आहे. दुसरीकडे चित्रपटाच्या निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाविरुद्ध न्यायालयात धाव घेतली आहे. पंजाबमधील वाढती व्यसनाधिनता हा चित्रपटाचा विषय आहे. पंजाबच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्याने अकाली दलाला चित्रपट अडचणीचा वाटत आहे. वस्तुस्थिती मांडणारा चित्रपट तयार केल्याबद्दल ओरड का, असा सवाल कलाकारांनी केला आहे. सेन्सॉरच्या कामात आम्ही हस्तक्षेप करीत नाही, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने म्हटले आहे. भाजपाही वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत आहे. पण भाजपा व मंत्रालय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
>फारच दुर्दैवी
मला या चित्रपटाविषयी फारशी माहिती नाही. मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा महत्त्वाचा आहे.- अमिताभ बच्चन
सामाजिक विषयावरील चित्रपटाविषयी जे घडत आहे, ते दुर्दैवी आहे. - आमिर खान