बोगस डॉक्टरने घेतला जीव
By Admin | Updated: August 12, 2014 01:06 IST2014-08-12T01:06:22+5:302014-08-12T01:06:22+5:30
कळमना परिसरात पुन्हा एका बोगस डॉक्टरने एका मजुराचा बळी घेतला. अनिल जगणे असे या बोगस डॉक्टरचे नाव असून, तो केवळ दहावी पास असल्याचे सांगितले जाते. कृषी कार्यातील

बोगस डॉक्टरने घेतला जीव
कळमन्यातील घटना : कृषी डिप्लोमाच्या आधारे उपचार
नागपूर : कळमना परिसरात पुन्हा एका बोगस डॉक्टरने एका मजुराचा बळी घेतला. अनिल जगणे असे या बोगस डॉक्टरचे नाव असून, तो केवळ दहावी पास असल्याचे सांगितले जाते. कृषी कार्यातील डिप्लोमा आणि नॅचरोपॅथीच्या बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर तो गेल्या पाच वर्षांपासून कळमन्यातील नवीननगर येथे दवाखाना चालवीत होता. जगणेच्या अटकेमुळे मनपा आरोग्य विभागाचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे.
जगणेद्वारा उपचारात निष्काळजीपणा केल्याने गेल्या ८ आॅगस्ट रोजी २२ वर्षीय योगेश ठाकूर नावाच्या मजुराचा मृत्यू झाला होता. रविवारी योगेशचे घरमालक ज्ञानेश्वर चौधरी यांनी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनंतर खरा प्रकार उघडकीस आला.
योगेश हा मूळचा फेटरी येथील रहिवासी असून तो मजूर होता. त्याचे कुटुंबीय कळमेश्वर रोडवरील फेटरी येथे राहतात. ८ आॅगस्ट रोजी सकाळी ७ वाजता योगेशला उलटी होऊ लागली. त्यामुळे घरमालक चौधरी यांनी त्याला जगणे याच्या दवाखान्यात नेले. जगणे याचा दवाखाना त्याच्या घरीच आहे. जगणे याने योगेशची प्रकृती गंभीर असून त्याला सलाईन लावावी लागेल, असे सांगितले. ९०० रुपये घेऊन तीन सलाईन आणि दोन इंजेक्शन दिले. यानंतरही त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे चौधरी त्याला घेऊन मेयो रुग्णालयात गेले. तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. कळमना पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता. पोलिसांनी रविवारी जगणेच्या दवाखान्यावर धाड टाकली. तिथे स्टेथॅस्कोप, औषधी आणि उपचाराचे साहित्य मिळाले. जगणेजवळून कृषी कामाचा डिप्लोमा आणि नॅचरोपॅथीची बोगस डिग्री मिळाली. याच्या आधारावरच तो लोकांवर अॅलोपॅथीने उपचार करीत होता. यानंतर त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)