बोगस डॉक्टरच्या दुसऱ्या पतीला अटक
By Admin | Updated: April 4, 2017 04:16 IST2017-04-04T04:16:01+5:302017-04-04T04:16:01+5:30
कोणतीही पात्रता नसताना बिनबोभाटपणे डॉक्टरकी करणाऱ्या डोंबिवली येथील एका महिलेच्या दुसऱ्या पतीलाही ठाणे पोलिसांनी रविवारी अटक केली.

बोगस डॉक्टरच्या दुसऱ्या पतीला अटक
ठाणे : कोणतीही पात्रता नसताना बिनबोभाटपणे डॉक्टरकी करणाऱ्या डोंबिवली येथील एका महिलेच्या दुसऱ्या पतीलाही ठाणे पोलिसांनी रविवारी अटक केली.
ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (घटक क्रमांक-१) ३० मार्च रोजी डोंबिवली येथील उंबर्ली रोडवरील साईबाबा नर्सिंग होमवर छापा टाकून बोगस डॉक्टर अनिता एस. ऊर्फ अनिता पोपट सावंत ऊर्फ अनिता मुरलीधर लोंढे ऊर्फ अनिता मोहम्मद सोहेल कश्मिरी हिला अटक केली होती. तिच्याजवळ वैद्यकीय व्यवसायाचा कोणताही परवाना पोलिसांना आढळला नव्हता.
दुसरा पती मोहम्मद सोहेल कश्मिरी याच्या मदतीने कल्याणफाटा परिसरात साईबाबा हॉस्पिटल गतमहिन्यात सुरू केले होते, अशी माहिती या महिलेने पोलिसांना तपासादरम्यान दिली. त्यानुसार, पोलिसांनी कल्याणफाट्यावरील साईप्रसाद इमारतीच्या पहिल्या माळ्यावरील सुमारे १२०० चौरस फुटांच्या सुसज्ज हॉस्पिटलची पाहणी केली. येथून औषधे, इंजेक्शनसह आणि अन्य साहित्य पोलिसांनी जप्त केले असून हॉस्पिटलला सील ठोकले आहे.
आरोपीच्या दोन्ही हॉस्पिटलमध्ये मोहम्मद सोहेल व्यवस्थापक म्हणून काम बघायचा. गुन्ह्यातील त्याचा सहभाग स्पष्ट झाल्याने पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे. पोलिसांनी या कारवाईमध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही मदत घेतली होती. (प्रतिनिधी)