'त्या' युवकाचा मृतदेह रामेश्वर मंदिर परिसरात सापडला
By Admin | Updated: July 13, 2016 16:09 IST2016-07-13T16:09:40+5:302016-07-13T16:09:40+5:30
सोमवार ११ जुलै रोजी अरुणावती नदीच्या बाजूला बंधारा पार करीत असताना मानोरा जुनीवस्तीतील युवक सुनिल भोरकडे वय २८ हा पुरामध्ये वाहुन गेला होता

'त्या' युवकाचा मृतदेह रामेश्वर मंदिर परिसरात सापडला
ऑनलाइन लोकमत,
मानोरा, दि. 13 - गेल्या पाच दिवसात पावसाने सततधार लावून धरल्याने सोमवार ११ जुलै रोजी अरुणावती नदीच्या बाजूला बंधारा पार करीत असताना मानोरा जुनीवस्तीतील युवक सुनिल भोरकडे वय २८ हा पुरामध्ये वाहुन गेला होता. सतत तीन दिवसाच्या प्रयत्नाने आज १३ जुलै रोजी रामेश्वर मंदिर परिसरात त्याचा मृतदेह आढळुन आला. यासाठी पोलिस व महसूल प्रशासनाने शोध मोहीम अंतर्गत परिसर पिंजुन काढला होता. मानोरा जुनीवस्ती येथील युवक सुनिल सिताराम भोरकडे व त्याचा मित्रपसोबत बंधारा पार करीत असतांना पाय घसरुन अरुणावती नदीच्या प्रवाहात पडला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील युवकांनी शोध घेतला तसेच पोलिस व महसूल प्रशासनाने अरुणावती तिरावरील येणारे खेडे,रामतिर्थ, कारखेडा, वरोली पर्यंत जावून शोधाशोध सुरु केली. दरम्यान मानोरा येथील धाडसी युवकांनी त्या दिवसापासून सतत तीन दिवस शोध घेण्यास पोलिस व महसूल प्रशासनास मदत केली. सततच्या पावसामुळे अनेक अडीअडचणीचा सामना करावा लागला. शोध मोहीम अधिक तीव्र करुन १३ जुलैला रामेश्वर मंदिर परिसरात सुनिल भोरकडे मृतावस्थेत आढळुन आला. यावेळी शोध मोहीमेमध्ये तहसीलदार अंबादास पाटील, मंडळ अधिकारी एम.डी.वाघमारे, तलाठी खंडारे, आचारकाटे तसेच पोलिस पाटील वासुदेवराव सोनोने व प्रभारी पोलिस निरीक्षक प्रविण नाचनकर, पि.एस.आय.धर्माजी डाखोरे, शिवचंद राठोड, इश्वर बाकल आदिंची उपस्थिती होती. सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.