युवक-युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
By Admin | Updated: October 20, 2016 04:59 IST2016-10-20T04:59:34+5:302016-10-20T04:59:34+5:30
गोंदियापासून १० किलोमीटर अंतरावरील एका कालव्याजवळ युवक आणि युवतीचा मृतदेह बुधवारी सकाळी आढळल्याने एकच खळबळ उडाली.

युवक-युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
रावणवाडी (गोंदिया) : गोंदियापासून १० किलोमीटर अंतरावरील एका कालव्याजवळ युवक आणि युवतीचा मृतदेह बुधवारी सकाळी आढळल्याने एकच खळबळ उडाली. रिव्हॉल्वरने गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली आहे की, युवकाने आधी तिच्यावर गोळ्या झोडून नंतर स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली, हे स्पष्ट झालेले नाही. नवाटोला घिवारी गावाच्या मध्यभागी असलेल्या नाल्याजवळ बुधवारी सकाळी ७च्या सुमारास आकाश भास्कर वैद्य (३२) आणि काजल मेश्राम (२८) यांचे मृतदेह आढळले. हे दोघेही काजलच्या डोक्यावर आकाशने स्वत:जवळ असलेल्या रिव्हॉल्वरमधून दोन गोळ्या झाडून तिची हत्या केली. नंतर स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली, असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. आकाशच्या खिशात आईच्या नावे मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठीही आढळली. तसेच रिव्हॉल्वर आकाशच्या पोटाखाली आढळले. या युवकाजवळ एक महागडी दुचाकी होती. (शहर प्रतिनिधी)
>चिठ्ठीतील अक्षराची तपासणी सुरु
आकाशने आईच्या नावे लिहिलेल्या चिठ्ठीत मुलीकडून सतत होणाऱ्या त्रासाचा कंटाळा आल्याचे नमूद आहे, असे तपास अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. मात्र चिठ्ठीतील अक्षरे आकाशचीच आहेत का, याची पडताळणी सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी आकाशला रेल्वे विभागात नोकरीसाठी कॉल आला होता. मात्र वैद्यकीय तपासणी झाली नसल्यामुळे तो कार्यरत झाला नव्हता. काजल ही गोंदियात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती. मात्र काही विषयांत ती अनुत्तीर्ण झाल्यामुळे चार महिन्यांपासून ती पुणे येथे काही व्होकेशनल कोर्सेस करण्यासाठी गेली होती.